नोकरी गेली, पैसाही नाही, घरमालकानंही दाखवला बाहेरचा रस्ता

विलेपार्लेतल्या कृपा नगर इथल्या एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला.

नोकरी गेली, पैसाही नाही, घरमालकानंही दाखवला बाहेरचा रस्ता
SHARES

राज्यात लॉकडाऊन असल्यानं अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी हातात पैसा नसल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच घरभाडे कसे भरावे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीनर गृहनिर्माण विभागानं भाड्यानं राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला होता. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्यानं कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागानं राज्यातील घरमालकांना दिल्या होत्या.

पण काही ठिकाणी या आदेशाचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं समोर येत आहे. मुंबईत बहुतांश नागरिक हे भाड्याच्या घरात राहतात. पण लॉकडाऊनमुळे महिन्याचं भाडं देणं शक्य न झाल्यानं अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण काहींवर रस्त्यावर राहायची वेळ आली. तर काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला. अशीच एक घटना विलेपार्ले इथं घडली आहे.

विलेपार्लेतल्या कृपा नगर इथल्या एका सोसायटीत राहणाऱ्या रीतू यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. रीतू या एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रीती यांना मार्चमध्ये अर्धा पगार हाती आला. त्यानंतर रीतू यांना  डिसकंटीन्यूएशनचं लेटर देखील आलं. त्यामुळे त्यांनी घर मालकाला तीन महिने अर्ध भाडं घेण्याची विनंती केली. शिवाय जर दुसरा कुणी भाडोत्री पूर्ण भाडं देऊन राहण्यास तयार असेल तर सात दिवसात घर खाली करण्याचं आश्वासनही दिलं. पण घर मालक तयार झाले नाहीत.

लॉकडाऊन असल्यानं मी घर मालकाला विनंती केली की पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्यांना म्हटलं की, लॉकडाऊनमध्ये शिफ्टींग कसं करणार? आता आम्हाला टॅम्पो कुठून मिळणार? पण त्यांनी तरीही आम्हाला पूर्ण भाडं देण्यास सांगितलं. त्यांनी तर मला मे महिन्याचं भाडं जूनमध्ये देण्याची सवलत दिली. पण त्यासोबत ते त्यावरील व्याज पण मागायला लागले. तेव्हा मी त्यांच्यावर भडकली.

- रीतू वर्मा, भाडेकरू

रीतू यांच्यानुसार हातात पैसे नसल्यानं खायचे वांदे आहेत. त्यात अधिक व्याज देणं तर रीतू यांना शक्य नव्हतं. रीतू चिडलेल्या पाहून घरमालकानं व्याज देऊ नका. पण भाडं मात्र पूर्ण द्यावचं लागेल, असं स्पष्ट केलं.

मी विनंती केल्यानंतर त्यांनी ३००० कमी केले. पण बाकीचे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील, असं त्यानं ठणकावून सांगितलं. पण माझ्या हातात तेव्हा एवढे पैसे नव्हते. म्हणून मी नकार दिला. तेव्हा त्यांनी घर खाली करण्यास सांगितलं. सो कसा-बसा टॅम्पो अरेंज केला आणि मग सात दिवसात घर खाली केलं.

- रीतू वर्मा

रीतू यांच्यावर दोन मुलांची जबाबदारी देखील आहे. त्या एकट्या कमवणाऱ्या होत्या. लॉकडाऊनमध्ये दुसरं भाड्याचं घर शोधणं कठिण होतं. शिवाय त्यांच्या हातात पैसे नव्हते. त्यामुळे त्या कांदिवलीतल्या आई-बाबांच्या घरी राहायला गेल्या. आता घरात फक्त त्यांचा भाऊ कमवता आहे. त्याला देखील कामावरून कमी करण्यात आल्याची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.  

रीतू यांनी विनंती केली तेव्हा घरमालकानं सांगितलं की, माझ्याही काही समस्या आहेत. मला पण इएमआय भरायचे असतात. त्यामुळे माझा नाईलाज आहे. यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही घर मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण व्यस्थ असल्याचं सांगत त्यांनी फोन ठेवून दिला.    हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन वाढले, बघा तुमचा परिसर आहे का यांत?

मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेज पालिकेच्या ताब्यात, इथंही १००० बेड्सची व्यवस्था

संबंधित विषय