तोच ठरेल सर्वोत्तम नगरसेवक!

  BMC
  तोच ठरेल सर्वोत्तम नगरसेवक!
  मुंबई  -  

  सभागृहात गोंधळ घालणारे, महापालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करणारे, वॉर्डातील विकासकामांकडे दुर्लक्ष करणारे अशी काही नगरसेवकांची ओळख बनली आहे. अशा बदनाम नगरसेवकांच्या प्रतिमेचा फटका काही वेळेस चांगल्या नगरसेवकांनाही बसतो. परिणामी वॉर्डात चांगले काम करूनही या नगरसेवकांचे कार्य झाकोळले जाते. त्यामुळे आपल्या वॉर्डात खरोखरच विकासकामे करून रहिवाशांचे मन जिंकणाऱ्या 5 नगरसेवकांचा दरवर्षी सन्मान करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रजा फाऊंडेशन ज्याप्रमाणे नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करते तसेच मूल्यमापन करून उत्कृष्ट नगरसेवकांची निवड करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

  मुंबई महापालिकेवर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी दरवर्षी 5 नगरसेवक/ नगरसेविकांच्या कार्याचे मूल्यमापन करून योग्य निकषाच्या आधारे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.


  गुणांकनाऐवजी कामगिरीच्या आधारे निवड

  प्रशासनाने यावर कुठलाही निर्णय घेतलेला नसला, तरी नगरसेवकांची निवड गुणांकनाच्या आधारे करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन होते. पण गुणांकाच्या आधारे नगरसेवकांची निवड करण्याऐवजी प्रजा फाऊंडेशन ज्याप्रकारे नगरसेवकांच्या कामाची माहिती संकलित करून, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून उत्कृष्ट नगरसेवकाची निवड करते, तशीच निवड महापालिकेनेही करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.


  संपूर्ण माहितीसह अर्ज करावा

  त्यावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत नगरसेवकांना पुरस्कार देण्याची तयारी दर्शवली आहे. नगरसेवक/ नगरसेविकांनी पुरस्कारासाठी आपल्या संपूर्ण माहितीसह महापौरांकडे अर्ज केल्यास किमान 5 नगरसेवकांना हा पुरस्कार देता येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.


  शिक्षा झालेला नगरसेवक, नगरसेविका अपात्र

  या पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या महिला तथा पुरुष नगरसेवकांचा एकूण कार्यकाल निर्दोष असणे आवश्यक आहे. इच्छुक नगरसेवकाला फौजदारी गुन्हाखाली दंड अथवा शिक्षा झाली असेल, तर तो नगरसेवक या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाही. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला संबंधित विभागातील पोलिस ठाण्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' तसेच 'हमीपत्र' देणे बंधनकारक असेल.


  जनसेवा करताना शासकीय तसेच निमशासकीय संस्थेबरोबर जनतेची गाऱ्हाणी सोडविताना नगरसेवक या नात्याने काही प्रसंगी मोर्चात सहभागी होणे, तंटे, वादविवाद होऊन पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारींचा यामध्ये समावेश नसेल.
  - हेमलता येखे, प्रमुख लेखापाल (वित्त)  हे वाचा - 'खड्ड्यांपेक्षा रस्ते, चौक नामकरणाला नगरसेवकांचं प्राधान्य'

  हे देखील वाचा -  बेस्टप्रमाणे महापालिकेलाही शिवसेना खड्ड्यात घालणार!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.