Advertisement

मुंबईत एकाच दिवशी ३ ठिकाणी भीषण आग


मुंबईत एकाच दिवशी ३ ठिकाणी भीषण आग
SHARES

मुंबई आगीचं सत्र अद्याप सुरूचं आहे. मुंबईत गुरूवारी एकाच दिवशी ३ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनांत जीवितहानी झाली नसली तरी एका घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी मात्र बेशुद्ध पडले.

मरोळमधील औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास आग लागली. तळमजल्यावर असलेल्या अडीच ते तीन हजार चौ. फुटांच्या जागेत साठवलेल्या डिझेल आणि इंधन तेलाच्या पिंपांना आग लागल्यामुळं काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग ३ ते ४ गाळ्यांमध्ये पसरली. ५ फायर इंजिन आणि फोम टेण्डर, ७ जम्बो टँकर यांच्या साहाय्यानं पहाटे पावणेपाच वाजता ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

ही आग विझवताना अग्निशमन अधिकारी बेशुद्ध झाले. आग विझवण्याचे काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली. सहकाऱ्यांनी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. त्यांची करोना चाचणी केली असता ते बाधित असल्याचे आढळले. तसेच त्यांना न्युमोनिया झाल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

अनधिकृत बांधकामांमुळं चर्चेत आलेल्या रघुवंशी मिलमध्ये सकाळी ९.१५ वाजता आग लागली. येथील ‘पी टू’ या ५ मजली इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरून आग नक्की कुठे लागली आहे, त्याचा जवानांनी शोध घेतला. ८ बंब, ६ जम्बो टँकर घटनास्थळी रवाना झाले होते.

नरिमन पॉइंट येथील जमनालाल बजाज मार्गावरील जॉली मेकर चेंबर इथं तळमजल्यावर असलेल्या ‘बँक ऑफ बहारीन अ‍ॅण्ड कुवेत’ या बँकेच्या सव्‍‌र्हर रूममध्ये पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास आग लागली. बॅंकेच्या आजुबाजूच्या संपूर्ण भागात आगीचा धूर पसरला होता. बँकेचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश करून आग विझवली.



हेही वाचा -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा