Advertisement

शासकीय महिला अधिकाऱ्यांनो, आता सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी बदली मिळणार!


शासकीय महिला अधिकाऱ्यांनो, आता सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी बदली मिळणार!
SHARES

आतापर्यंत शासकीय महिला कर्मचाऱ्यांना आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांच्या सेवेसाठी  बदलीचा अर्ज करता येत होता. पण आता यापुढे पतीच्या आई-वडिलांसाठी म्हणजेच सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेत असलेल्या महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार आहे. त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. 


मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यावी, यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी राज्य सरकारच्या अखत्यारीत सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठी बदली करून मिळण्याची अथवा महसूल विभाग बदलून मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अनेक महिलांना इच्छा असूनही सासू-सासऱ्यांची सेवा करता येत नव्हती. नेमकी ही बाब हेरून या नियमावलीतच बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार महसूली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही करण्यात आला.


महसुली विभागाचा पर्याय

राज्य शासनातील गट अ आणि गट ब (राजपत्रित आणि अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने आणि पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम - २०१५ तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना किंवा आपला जोडीदार, मुले अथवा अवलंबून असलेले आई-वडील यांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तव महसूल विभाग बदलण्यासाठी विनंती अर्ज करण्याची मुभा होती. यामध्ये सुधारणा करून आता महिला अधिकाऱ्यांनाही आपल्या सासू-सासऱ्याच्या सेवेसाठीही महसुल विभाग बदलून मिळण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा