Advertisement

बीकेसीत दोन हेलिपॅड, हवाई रुग्णवाहिकांसाठी मिळणार तळ

लवकरच निविदा जाहीर करण्यात येणार आहेत.

बीकेसीत दोन हेलिपॅड, हवाई रुग्णवाहिकांसाठी मिळणार तळ
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुलाचे (BKC) नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या दृष्टीने येथे एकाच वेळी दोन हेलिपॅड उभारले जाणार आहेत. या माध्यमातून महसूल मिळविण्याचे नियोजन मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. त्यासाठी लवकरच निविदा जाहीर करण्यात येणार आहेत.

बीकेसीतील चार भूखंडांच्या विकासासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. त्यापैकी सीआरझेड श्रेणीतील एक आणि अन्य दोन भूखंडांवर खेळाचे मैदान, बगीचा असेल. तर सीआरझेड क्षेत्राबाहेरील ४३ हजार ५७९.७८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर १२ हजार चौरस मीटर बांधकामाचे मनोरंजन केंद्र अर्थात क्लब हाऊस, ५६५ चौरस मीटरवर दोन हेलिपॅड उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने अलीकडेच झालेल्या एका बैठकीत घेतला.

या बैठकीला अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

‘आगामी काळात आयएफएससी याच परिसरात उभे होणार आहे. त्यादृष्टीने हेलिपॅडची सेवा महत्त्वाची असेल. ते मिठी नदीकिनारी उभे केल्यास उड्डाण सुयोग्य होऊ शकेल,’ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राधिकरणाला सुचवले.

या सूचनेनुसार हे दोन्ही हेलिपॅड मोकळ्या मैदानावर किंवा त्यापैकी एक हेलिपॅड क्लब हाऊसच्या छतावर करण्याचे नियोजन एमएमआरडीए करीत आहे. याच परिसरात क्लब हाऊसला जोडून बॅन्क्वेट हॉलदेखील असेल. या तिन्हीच्या उभारणीसाठी एमएमआरडीए लवकरच निविदा जाहीर करणार आहे. तिन्ही उभारणी करणाऱ्या कंत्राटदाराला क्लब हाऊसमधील सभासदांकडील शुल्क, हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्याचे शुल्क व बॅन्क्वेट हॉलमधील कार्यक्रमांचे शुल्क, या माध्यमातून महसूल मिळेल. त्या महसुलातील किमान ५ कोटी रुपये प्रति वर्ष एवढे शुल्क एमएमआरडीएकडे भरायचे आहे. या शुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढ केली जाणार आहे.

सध्या कुठे?

मुंबईत सध्या जुहू एअरोड्रोम हा पूर्णपणे हेलिकॉप्टरचा तळ आहे. तर महालक्ष्मी रेसकोर्सला सार्वजनिक उपयोगाचे हेलिपॅड आहे. उर्वरित जवळपास १८ ठिकाणी खासगी हेलिपॅड आहेत. हे खासगी हेलिपॅड काही उद्योगपतींच्या बंगल्यांच्या छतावर तर काही निवासी संकुल आणि कारखाना परिसरातील हिरवळीवर आहेत.



हेही वाचा

ठाणे स्थानकात रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा

ठाण्यातील जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा