महापौरांच्या स्टुटगार्ट दौऱ्यावर टांगती तलवार, कोटक आणि रईस शेख यांची माघार


SHARE

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते जर्मनीतील स्टुटगार्टला जाण्याच्या तयारीत असले तरी अद्यापही या दौऱ्यावर टांगती तलवार आहे. रशियाच्या दौऱ्याप्रमाणेच भाजपचे गटनेते मनोज कोटक यांच्यासह सपाचे गटनेते रईस शेख यांनीही स्टुटगार्टला जाण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे खुद्द महापौरांनाही हा दौरा होईल की नाही, याबाबत साशकंता आहे. त्यामुळे महापौर येत्या २५ सप्टेंबरला स्टुटगार्टला जाणार का? की हा दौरा रद्द होणार आणि गेलेच तर त्यांच्यासोबत कोण असणार, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले अाहेत.


महापौरांसह गटनेत्यांना निमंत्रण

जर्मनी येथे भगिनी शहर संबंधीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण जर्मनीच्या स्टुटगार्ट शहराच्या वतीनं मुंबई महापौर, उपमहापौर तसेच सर्व गटनेत्यांना पाठवण्यात आलं आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करून स्टुटगार्टला जाण्याचा निर्णय मुंबईच्या महापौरांनी घेतला आहे. गेल्या महिन्यातील गटनेत्यांच्या सभेत याला मंजुरी देण्यात आली होती.


व्हिसाची प्रक्रिया पूर्ण

त्यानुसार या दौऱ्याकरिता महापौरांसह सर्व गटनेत्यांच्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ भाजपाचे मनोज कोटक आणि सपाचे रईस शेख हे व्हिसा करता गेले नव्हते. परंतु या दोघांचेही व्हिसा असल्यामुळे त्यातही काही अडचण नसल्याचं बोललं जात आहे.


तिकीटं प्रक्रिया अपूर्ण

दरम्यान, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसह स्टुटगार्टला निमंत्रित राहण्याचं निमंत्रण आहे, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याप्रमाणे सर्वजण जाण्याच्या विचारात असल्याचं ते म्हणाले. याबाबतची तिकीट प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, त्यात अडचण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.


मनोज कोटक यांची माघार

या दौऱ्याबाबत ज्यांच्याकडे प्रमुख लक्ष आहे, ते भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मात्र आपण जवळपास या दौऱ्यात जाणार नसल्याचे मुंबई लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलं. या दौऱ्याच्या अजेंड्याविषयी आपण महापौरांकडे विचारणा केली होती. परंतु तेथील अभ्यास दौऱ्याचा अजेंडा अद्यापही न दिल्यामुळे आपण तिथं न जाण्याचाच निर्णय घेतला अाहे. सपाचे गटनेते रईस शेख यांनीही आपण या दौऱ्यावर जात नसल्याचं स्पष्ट केलंय. मागील दोन दिवसांपासून आपण आजारी असल्यामुळे परदेश दौऱ्यावर जाणं शक्य नाही. याची कल्पना आपण महापौरांना दिल्याचं रईस शेख यांनी म्हटलं आहे.


सर्व खर्चाला केंद्राला परवानगी?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापौरांसह सर्व गटनेते विमानाचा खर्च स्वत: करत असून तेथील राहण्याचा खर्च हा स्टुटगार्ट शहराच्या वतीनं केला जाणार आहे. परंतु या खर्चालाही राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. ती परवानगी अद्याप मिळाली नसल्याचं समजतं. यापूर्वी स्टुटगार्टचा एक दौरा रद्द झाला होता. त्यानंतर हा दुसरा दौरा आयोजित केला आहे. परंतु हा दौरा रद्द झाल्यास वारंवार रद्द होणाऱ्या या दौऱ्यांमुळे परदेशात आपल्या महापौरांसह लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला तडा जाईल, अशीही भीती वर्तवली जात आहे.


हेही वाचा -

गणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त

धक्कादायक! मुंबईतील रेल्वेमार्गावरील केवळ ६ उड्डाणपूलच भक्कम

मुंबईतील उद्यानांची वेळ वाढवली, दुपारी १२ ते ३ मध्येच राहणार बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या