बोगस पॅथोलॉजिस्ट्सच्या मुसक्या आवळणार

  Mumbai
  बोगस पॅथोलॉजिस्ट्सच्या मुसक्या आवळणार
  मुंबई  -  

  गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह राज्यभरात बोगस पॅथोलॉजिस्ट्सचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कुणीही उठसूठ पॅथोलॉजी लॅब उघडून आपल्याकडे परवाने असल्याची बतावणी करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये अशा बोगस पॅथोलॉजिस्ट्सवर कारवाईही झाली आहे. मात्र अजूनही ही समस्या समूळ नष्ट झाल्याचं दिसून येत नाही.

  कुठेही साधा तंत्रज्ञ म्हणून काम करणारी व्यक्तीही पॅथोलॉजी लॅब उघडून रक्त आणि इतर चाचण्या करुन त्या अहवालांवर सह्या करताना दिसते. या अहवालांवर नक्की कुणाच्या कुणाच्या सह्या असाव्यात याबाबत संभ्रम दिसून येत होता. आता मात्र हा संभ्रम इंडियन मेडीकल कौन्सिल (एमसीआय)ने दूर केला आहे. एमसीआयकडे नोंदणी केलेला लॅबोरेटरी विषयात प्रशिक्षित असलेला डॉक्टर अर्थात पॅथोलॉजिस्टच या चाचण्यांच्या अहवालांवर सह्या करू शकतो, असे स्पष्टीकरण नुकतेच एमसीआयने एका पत्राद्वारे दिले आहे.


  कायद्यात याबाबतची तरतूद आधीपासूनच आहे. पण त्याचे पालन होत नसल्याने, तसेच याबाबत जनजागृती नसल्याने, बोगस पॅथोलॉजिस्ट्सचा धंदा तेजीत असल्याचे बोलले जात आहे. आता मात्र या स्पष्टीकरणानुसार बोगस पॅथोलॉजिस्ट्सविरोधात कारवाई झाली, एमसीआयकडे तक्रारी आल्या आणि एमसीआयने कारवाई केली, तर नक्कीच बोगस या प्रकारांना आळा बसेल.

  डॉ. शिवकुमार उत्तुरे, सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

  नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फाॅर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजने रक्त आणि इतर चाचण्यांवर कोणती व्यक्ती सह्या करु शकते याविषयीची विचारणा केली होती. त्याच्या उत्तरादाखल एमसीआयने नोंदणीकृत लॅबोरेटरीज विषयात प्रशिक्षित असलेल्या डाॅक्टरांनाच अर्थात नोंदणीकृत पॅथोलॉजिस्ट्सनाच अहवालावर सह्या करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलचे सदस्य डाॅ. शिवकुमार उत्तुरे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना ही माहिती दिली.


  बोगस पॅथोलॉजिस्ट्सविरोधात कुठल्याच संबंधित विभागाकडून कारवाई होत नाही. त्यामुळेच त्यांचे फावत आहे. आता एमसीआयच्या या पत्रानुसार बोगस पॅथोलॉजिस्ट्सविरोधात कारवाई होणे सोपे होईल. तशी कारवाई संबंधित विभागाने करावी, एवढीच आमची मागणी आहे.

  डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजिस्ट्स अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट

  या नवीन पत्रानुसार आता बोगस पॅथोलॉजिस्ट्सवर कारवाई कधी होणार? हाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.