जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे धारावी आणि वांद्रेतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून वांद्रे पूर्व येथील ४८ इंच जलवाहिनी दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे सोमवार ५ ऑक्टोबरपासून मंगळवार ६ ऑक्टोबरपर्यंत वांद्रे आणि धारावीतील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. तसंच परिसरातील काही भागांत ५० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.वांद्रे येथील अँकर ब्लॉक, वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथे ४८ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सोमवारी दुपारी १२ ते मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रेतील टर्मिनस परिसर आणि वांद्रे रेल्वे कॉलनी या परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर सोमवारी धारावी परिसरातील जस्मीन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प या भागांत पहाटे ४ ते दुपारी १२ वा.पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड, दिलीप कदम मार्ग या भागात संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत ५० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर मंगळवारी वांद्रेतील नवपाडा, निर्मलनगर, बेहरामपाडा, शांतीलाल कंपाऊंड, कलानगर, गोळीबार रस्त्याचा काही भाग, बीकेसी या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे.
हेही वाचा