मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मुंबईतील (mumbai) रुग्णसंख्या जानेवारीच्या अखेरीस नियंत्रणास आली होती. मात्र, फेब्रुवारीत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. पश्चिम उपनगरांतील रुग्णवाढीचा वेग अन्य भागांच्या तुलनेत अधिक आहे. बोरिवली, अंधेरी (पूर्व-पश्चिम), मालाड परिसर रुग्णवाढीत आघाडीवर आहेत.
अंधेरी (पश्चिम) भागातील सक्रिय रुग्णांची संख्या २७ मार्च रोजी ३ हजार ६६४ होती. या भागातील एकूण २३ हजार ०३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येच्या यादीत हा भाग आघाडीवर आहे. त्याखालोखाल बोरिवलीमध्ये २ हजार ४६३ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. या भागात आतापर्यंत ६६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २३ हजार ५६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
अंधेरी (पूर्व) भागातील १९ हजार ५७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ३०२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. मालाडमध्येही २ हजार १५७ रुग्ण उपचाराधीन असून, आतापर्यंत १९ हजार ७६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्यस्थिती पाहता अन्य भागांच्या तुलनेत या परिसरातील सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.
मुंबईमधील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ५८ दिवसांवर घसरला आहे. वांद्रे पश्चिम भागात (एच-पश्चिम) हा दर ४३ दिवसांवर, चेंबूर पश्चिम भागात (एम-पश्चिम) ४४ दिवसांवर, गोरेगावमध्ये (पी-दक्षिण) ४५ दिवसांवर, अंधेरी पश्चिममध्ये (के-पश्चिम) आणि घाटकोपरमध्ये (एन) प्रत्येकी ५० दिवसांवर आला आहे. मुंबईमधील अन्य भागांच्या तुलनेत ‘बी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत (सॅण्डहर्स्ट रोड आणि आसपासचा परिसर) रुग्णदुपटीचा काळ १३३ दिवसांवर आहे.
वांद्रे पश्चिम भागात रुग्णवाढीचा दर अधिक
मुंबईमधील रुग्णवाढीचा दर सरासरी १.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. वांद्रे पश्चिम परिसरात हा दर १.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीच्या यादीत चेंबूर पश्चिम परिसर दुसऱ्या क्रमांकावर असून, या भागात रुग्णवाढीचा दर १.५९ टक्के आहे. गोरेगाव परिसरात (पी-दक्षिण) हा दर १.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या 'बी' विभाग कार्यालयाच्या हद्दीतील (सॅण्डहर्स्ट रोड आणि आसपासचा परिसर) रुग्णवाढीचा दर सर्वाधिक कमी म्हणजे ०.५२ टक्के आहे.
हेही वाचा -
नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शरद पवारांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, बुधवारी शस्त्रक्रिया