आता मुंबईतही प्लास्टिक तांदूळ?

  Mumbai
  आता मुंबईतही प्लास्टिक तांदूळ?
  मुंबई  -  

  मुंबईसह देशभर एप्रिल-मे दरम्यान एकच अफवा आणि चर्चा रंगली होती, ती म्हणजे प्लास्टिक अंड्याची. चिनी बनावटीची प्लास्टिक अंडी बाजारात विकली जात असल्याच्या वृत्ताचा सर्वांनीच धसका घेतला होता. पण प्लास्टिक अंडी नसल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता मात्र प्लास्टिक अंड्यांचा विषय संपतो न संपतो तोच प्लास्टिक तांदळाचा विषय चर्चेत आला आहे. 

  पश्चिम बंगालमध्ये कुठल्याशा एका रेस्टॉरंटमध्ये प्लास्टिक तांदळापासून तयार केलेला भात ग्राहकांना दिला जात असल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ माजवली असून, आता हे प्रकरण थेट मुंबईत पोहोचले आहे. अंधेरीतील एका महिलेने चक्क अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)कडे प्लास्टिक तांदळाविषयी तक्रार केली आहे. त्यानुसार एफडीएने तांदळाचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवले असून, या महिलेचा जबाबही नोंदवल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. मात्र त्याचवेळी जशी प्लास्टिकची अंडी ही एक वावडी होती, तशीच प्लास्टिक तांदूळ हीसुद्धा एक वावडी असून, त्यावर ग्राहकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, घाबरू नये असे आवाहनही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून केले आहे.


  हेही वाचा 

  मुंबईकरांनो, बिनधास्त खा अंडी


  सोमवारी एफडीएच्या मुंबई विभागाकडे अंधेरी, लोखंडवाला परिसरातील एका महिलेने प्लास्टिक तांदळासंदर्भात तक्रार केली आहे. आपण लोखंडवाला येथील एका दुकानातून तांदूळ खरेदी केले असून, हे तांदूळ शिजवले असता ते चिवट झाले असून, त्याचा गोळा केला असता ते प्लास्टिकच्या बॉलसारखे झाल्याचे म्हणत या महिलेने तक्रार केल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे. तर प्लास्टिक तांदूळ असूच शकत नाही हे जरी खरे असले तरी ग्राहकांमधील अफवेच्या पार्श्वभूमीवर या तक्रारीची त्वरीत दखल घेत अधिकाऱ्यांनी मंगळवारी ज्या दुकानातून या महिलेने तांदूळ घेतले त्या दुकानातील तांदूळ जप्त करत त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवले आहेत. दोन दिवसांत यासंबंधीचा अहवाल अपेक्षित आहे. मुळात प्लास्टिकचे तांदूळ शिजतीलच कसे? आणि प्लास्टिकचे पचन होईलच कसे? असे अनेक सवाल उपस्थित करत एफडीएने प्लास्टिकच्या तांदळाची शक्यता नाकारली आहे. तर प्लास्टिक अंडयाप्रमाणेच हेही सोशल मीडियावरील खूळ असल्याचे म्हणत जनतेला यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

  प्लास्टिक तांदुळाच्या बातमीसोबतच सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडिओही व्हायरल होऊ लागले.

  दरम्यान, याविषयी कृषी अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही प्लास्टिक तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे वृत्त फेटाळले आहे. 

  विविध कलात्मक वस्तू वगैरे तयार करण्यासाठी प्लास्टिक तांदूळ तयार केले जातात. पण प्लास्टिक तांदळाची शेती शक्य नाही. प्लास्टिक तांदूळ शिजणारही नाहीत. भात शिजवताना पाण्याचे प्रमाण कमी अधिक झाले तर भात चिवट होतो आणि त्याचा चेंडूसारखा गोळा होतो. पण हा चेंडूसारखा गोळा म्हणजे प्लास्टिक असे होऊच शकत नाही. सोशल मीडियावरून चुकीच्या गोष्टी पसरवत जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असून, जनतेने घाबरुन जाऊ नये. 

  - डॉ. गिरधर पाटील, कृषी अभ्यासक

  दरम्यान, दोन दिवसांनंतर एफडीएकडून तांदळाच्या नमुन्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल, असे सांगतानाच एफडीएने प्लास्टिक तांदळाची शक्यता ठामपणे नाकारली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.