मुंबई महापालिकेला अजूनही विरोधी पक्षनेता नाहीच!

 BMC
मुंबई महापालिकेला अजूनही विरोधी पक्षनेता नाहीच!

मुंबई - मुंबई महापालिकेच्या विरोध पक्षनेतेपदी अद्यापही निवड झालेली नाही. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड न झाल्यामुळे काँग्रेसचे गटनेते रविराजा यांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपाची विरोधीपक्ष नेतेपदी निवड केली जावी, अशी सूचना केली. मात्र, विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार हा महापौरांचा असल्यामुळे याबाबत विधी विभागाकडून अभिप्राय सादर करण्याचे आदेश महापौरांनीच प्रशासनाला देत भाजपाच्या गळ्यात विरोधीपक्ष नेतेपदाची माळ घालून राजकीय कुरघोडी करण्याची सुवर्णसंधी सोडली.

महापालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसून लोकशाहीची प्रतारणा करण्याचे काम केले जात असल्याची बाब काँग्रेसचे गटनेते रविराजा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मांडली. महापलिका अधिनियमानुसार महापौर, उपमहापौरांसह विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेत्यांची निवड केली जाते. परंतु महापालिकेच्या चार सभा झाल्या तरीही विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नाही. तसाच अर्थसंकल्प मांडला गेला आहे. सभागृहात अर्थसंकल्पावरील पहिले भाषण हे विरोधी पक्षनेते करत असतात. पण अद्यापही ही निवड झालेली नसल्यामुळे महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष असलेल्या आणि सत्तेच्या बाहेरील मोठा पक्ष असलेल्या भाजपाला विरोधी पक्ष म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी सूचना राजा यांनी केली.

या वेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार हा महापौरांचा आहे. राहिला मुद्दा आम्ही विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याचा तर भाजपा विरोधात बसणार नाही हे आधीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर करत पारदर्शकतेचे रक्षक म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. तर सपाचे रईस शेख यांनी महापौरांनी कायद्याच्या आधारे विरोधी पक्षनेत्यांची निवड करावी, अशी मागणी केली. तर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हा अधिकार महापौरांचा असल्यामुळे तसेच भाजपाने याबाबत मत व्यक्त केल्यामुळे महापौरांनी विधी विभागाकडून कायदेशीर मत मागवून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला आदेश देत विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी कायदेशीर अभिप्राय देण्याचे आदेश दिले.

Loading Comments