SHARE

मुंबई - महावितरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे घेतले जाणारे रिडिंग नागरिकांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरत आहे. बहुतांष वेळी चुकीचे रीडिंग घेतले जाते किंवा रीडिंग न घेता वीजबिल पाठवले जाते. याविरोधात वारंवार तक्रारी महावितरणकडे येत असतात. ग्राहकांच्या तक्रारीनंतर महावितरण कंपनीने मीटर पुरवणाऱ्या रोलेक्स कंपनीचे 1 लाख 12 हजार 519 आणि फ्लॅश कंपनीचे 24 हजार 395 मीटर्स बदली करण्यात आले आहेत. मात्र तरीही शुक्रवारी विधानसभेमध्ये या कंपनीच्या सदोष मीटर्सविरोधात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी नापंसती व्यक्त केली.

विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी सांगितले की, "अजून बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारच्या तक्रारी येत आहेत. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रीडिंगमुळे जास्त बिल भरण्याची नामुष्की लोकांवर येते". यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली की, "आता प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरामध्ये सुरू असलेल्या मीटरवर लक्ष ठेवू शकतो. महावितरण कंपनीने सुरू केलेल्या अॅपमुळे आता ग्राहक जास्त सतर्क राहू शकतो. आपल्या मीटरचा स्क्रीनशॉट काढून या अॅपवर अपलोड करू शकतो. तसेच मोबाईल अ‍ॅपवर ग्राहकांना वीज बिल पाहता येईल, तक्रार नोंदवता येईल आणि मीटर रीडिंग वीज कंपनीला पाठवता येणार आहे." चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांना आवाहन केले आहे की आपल्या विभागात याबद्दल जागरुकता निर्माण करा. जेणेकरुन ग्राहकांना याचा मोठा फायदा होईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या