Advertisement

यंदाही मुंबई तुंबणार?


यंदाही मुंबई तुंबणार?
SHARES

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने नुकताच केला होता. प्रत्यक्षात शहरात नालेसफाईची अवघी ३५ टक्केच कामे झाल्याचे दिसून येत आहे. वडाळा, माटुंगा, सायन, दादर, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागातील भूमिगत नालेसफाई करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली. यामुळे मुंबई शहरातील सखल भागात पुन्हा एकदा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

[हे पण वाचा - शहरातील छोट्या नाल्यांकडे कंत्राटदारांची पाठ]

स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला नालेसफाईचे काम 31 मे पूर्वी कसे पूर्ण होणार असा सवाल केला. त्याला उत्तर देताना आतापर्यंत सहा वेळा निविदा काढूनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची कबुली प्रशासनाने दिली. ठेकेदार मिळत नसल्याने दक्षिण मध्य मुंबईत नालेसफाई झाली नसल्याचेही समोर आले आहे.

मिठी नदी तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरातील मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्याचे काम सुरू असून शहरातील एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील भूमिगत मोठ्या गटारांमधील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार तयार नसल्याने प्रभाग कार्यालयांतर्फे स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्यात आल्याचे पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पांचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले.

[हे पण वाचा- नालेसफाईबाबत पारदर्शकतेचे पहारेकरी मूग गिळून]

छोट्या नाल्यांच्या सफाई कामांबाबत माहिती देताना व्हटकर यांनी सांगितले कि, छोट्या नाल्यांच्या आणि रस्त्यांलगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर होत असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 3 लाख 70 हजार 954 दिवसांचा (Man Days); तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी (Road Side Drains / Water Entrances) 2 लाख 41 हजार 546 दिवसांचा (Man Days) वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यदिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ही कामे देखील प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा