Advertisement

'अक्षयपात्रा'साठी महिला बचतगटांच्या पोटावर लाथ?


'अक्षयपात्रा'साठी महिला बचतगटांच्या पोटावर लाथ?
SHARES

पवईतील हयात हॉटेल शेजारील जागा 'अक्षयपात्रा फाऊंडेशन'ला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु 5 हजार किंवा 50 हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार पुरवण्यासाठी देण्यात येत नसून भविष्यात सव्वा तीन लाख विध्यार्थ्यांना पोषक आहार पुरवण्यासाठी ही मोक्याची जागा देण्याचा घाट आहे. त्यामुळे आधी इस्कॉनचा शिरकाव करुन अनेक महिला बचत गटांना बेरोजगार कऱण्यात आले. परंतु आता सर्वच महिला बचत गटांना महापालिकेतून हद्दपार केले जाणार असून यासाठी शिवसेनेनेच फिल्डींग लावली आहे.


महापालिका शाळांमधील सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्याच्या नावाखाली पवईतील तब्बल 30 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा'अक्षयपात्रा फाऊंडेशन'या संस्थेच्या घशात घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेला ही जागा निशुल्क देण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे. मात्र, 'अक्षयपात्रा फाऊंडेशन'ला ही जागा ‘मध्यवर्ती स्वयंपाकगृहा’साठी(सेंट्रल किचन)मोफत देण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. केवळ 5 हजार विद्यार्थ्यांसाठी 30 हजार चौरस फुटाची जागा कशाला? असा सवाल विरोधी पक्षनेते तसेच भाजपाने उपस्थित केला होता.


ताब्यात येताच वाटप करण्याचा  डाव

पवईतील हयात हॉटेलच्या ताब्यात असलेली ही जागा मोठ्या शिकस्तीने महापालिकेच्या ताब्यात आली आहे. परंतु ही जागा ताब्यात येताच सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ही जागा 'अक्षयपात्रा फाऊंडेशन'ला महापालिका शाळांमधील मुलांना मध्यान्ह भोजन पुरवण्यासाठी देण्याची मागणी करत तसे निवेदन गटनेत्यांच्या सभेत केले आणि या पत्रस्वरुपातील प्रस्तावाला काँग्रेसच्या विरोधानंतरही मंजुरी देण्यात आली.


महिला बचत गटांच्या रोजगारावर पाणी?

मुंबई महापालिकेच्या 1100 शाळांमधल्या 3 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना सध्या महिला बचत गटांच्या माध्यमातून मध्यान्ह भोजनाचा पुरवठा केला जातो. यापूर्वी इस्कॉनला शिरकाव करायला देऊन महिला बचत गटांची कामे कमी करण्यात आली होती. परंतु आता 'अक्षयपात्रा फाऊंडेशन'ला 30 हजार चौरस फुटांची मोक्याची जागा बहाल करून त्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यास दिली जात आहे. त्यामुळे हे मध्यवर्ती स्वयंपाकगृह दाखवून ही संस्था महापालिकेच्या शाळांमधील शालेय पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट घेईल आणि महिला बचत गटांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागणार आहे.


'अक्षयपात्रा'ला दिले जाणार खिचडी पुरवण्याचे काम

महापालिकेतून आता महिला बचत गट हद्दपार होणार आहे. कारण यापुढे मध्यान्ह भोजनासाठी महिला बचत गटांना काम देणार नाही. प्रायोगिक तत्वावर सुरु केल्या जाणाऱ्या 'अक्षयपात्रा फाऊंडेशन'लाच हळूहळू सगळे काम दिले जाणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुख्य म्हणजे या निर्णयाबाबत कुठल्याही नगरसेवकांना कल्पना देण्यात आलेली नाही. अक्षय पात्रा संस्था पहिल्या टप्प्यात 5 हजार आणि त्यानंतर पुढील तीन महिन्यात 50 हजार मुलांना पोषक आहाराचा पुरवठा करेल. त्यानंतर महापालिका शाळांमधील सव्वा तीन लाख मुलांना ते मध्यान्ह भोजनाचा पुरवठा करेल, असे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.


भूखंडाचे श्रीखंड चाखायचा शिवसेनेचा प्रयत्न

ही जागा संस्थेला देण्याच्या विरोधात आपण आहोत. गटनेत्यांच्या सभेत आपण रेकॉर्डवर विरोध दर्शवला आहे. खरे सांगायचे तर शिवसेनेच्या वतीने सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी या तोंडी स्वरुपात आहेत. त्यामुळे शिवसेनेला एकतर भूखंडाचे श्रीखंड तरी खायचे आहे किंवा त्यांना महिला बचत गटांना बेरोजगार तरी करायचे आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.


महिला बचत गटांना भविष्यात काम मिळणे कठीण

हा प्रस्ताव घाईघाईत मंजूर करु नये, अशी सूचना आम्ही गटनेत्यांच्या सभेत केली होती. परंतु त्यांना हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई आहे. यात नक्की काय लपलेय हे माहीत नाही. परंतु, आता ज्या पद्धतीने सभागृहनेते माध्यमांशी बोलतात, त्यानुसार ही जागा मध्यवर्ती स्वयंपाकगृहासाठी या संस्थेला देण्याचा त्यांचा पूर्ण मानस आहे. त्यामुळे जर या संस्थेचं मध्यवर्ती स्वयंपाकगृह असेल, तर भविष्यात छोट्या छोट्या महिला बचत गटांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्याची कंत्राटे घेता येणार नाहीत. त्यामुळे भविष्यात महिला बचत गटांना एकप्रकारे बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली.


महिला बचत गट आक्रमक

उत्तरप्रदेशमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थेचा कोणताही अनुभव नसताना त्यांना ही जागा देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे याचा तीव्र निषेध महिला बचत गटांकडून केला जात आहे. याबाबत गुरुवारी महिला बचत गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील महिला बचत गटांना मुंबै बँकेच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यातून मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारता येणार असल्याचे महिला बचत गटांचे म्हणणे आहे.


न्यायालयात धाव घेणार

हयात हॉटेलशेजारी सेवा सुविधांसाठी राखीव असलेला हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आल्यामुळे याठिकाणी प्रसूतीगृह किंवा मुलांना खेळण्यास उद्यान विकसित व्हावे ही मागणी आहे. परंतु ही जागा ताब्यात आल्यानंतर चार महिन्यात संस्थेच्या घशात घातली जात असल्यामुळे याविरोधात आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यानी सांगितले.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा