Advertisement

सनरायझर्स हैदराबाद फायनलमध्ये, अाता जेतेपदासाठी चेन्नईशी झुंजणार


सनरायझर्स हैदराबाद फायनलमध्ये, अाता जेतेपदासाठी चेन्नईशी झुंजणार
SHARES

मोठ्या कष्टानं अायपीएलची बाद फेरी गाठणाऱ्या अाणि संघात मोठ्या खेळाडूंचा अभाव असतानाही क्वालिफायर-२ सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचं अायपीएलच्या अंतिम फेरीत मजल मारण्याचं स्वप्नं अखेर आज भंगलं. सनरायझर्स हैदराबादनं विजयासाठी ठेवलेलं १७५ धावांचे लक्ष्य पार करताना ख्रिस लिनने कोलकाताला विजयासमीप आणून ठेवलं. पण मधल्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे कोलकाताला १३ धावा कमी पडल्या. या विजयासह सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलची अंतिम फेरी गाठली अाहे. अाता रविवारी संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या अायपीएल-११च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद अशी लढत रंगणार अाहे. त्याबरोबर सनरायझर्सला क्वालिफायर-१ मधील पराभवाचा वचपा काढण्याचीही संधी मिळणार आहे.



सनरायझर्सची चांगली सुरुवात

कोलकाता नाइट रायडर्सनं नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. पण वृद्धिमान साहा अाणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून देत कोलकाताचा निर्णय फोल ठरवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भर घातली. साहानं ३५ तर धवननं ३४ धावा फटकावल्या.



कुलदीप यादवची प्रभावी फिरकी

सनरायझर्सची सलामीची जोडी मैदानावर स्थिरावली असताना फिरकीपटू कुलदीप यादवनं कोलकाताला पहिला ब्रेक-थ्रू मिळवून दिला. शिखर धवनला पायचीत पकडत कुलदीपनं सनरायझर्सला पहिला हादरा दिला. त्यानंतर त्याच षटकांत कर्णधार केन विल्यम्सनला (३) बाद करत कुलदीपनं कोलकाताला कमबॅक करून दिलं. लेगस्पिनर पीयूष चावला यानंही साहाला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी स्टंपअाऊट करत सनरायझर्सला अडचणीत अाणलं.



राशिद खानची तुफानी फलंदाजी

सनरायझर्स संघ १५० धावांपर्यंत मजल मारणार नाही, असं वाटत असतानाच अखेरच्या दोन षटकांमध्ये राशिद खानचा झंझावात पाहायला मिळाला. शिवम मावी अाणि प्रसिध कृष्णा यांना राशिदने चांगलाच चोप दिला. १० चेंडूंत २ चौकार अाणि ४ षटकार कुटत राशिदनं नाबाद ३४ धावा फटकावल्या. त्यामुळे सनरायझर्सला १० षटकांत ७ बाद १७४ अशी अाव्हानात्मक धावसंख्या उभारता अाली.


कोलकाताची दमदार सलामी

चांगली सुरुवात करून देण्यासाठी अोळखल्या जाणाऱ्या सुनील नरिननं सुरुवातीपासूनच सनरायझर्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यानं १३ चेंडूंत ४ चौकार अाणि १ षटकार लगावत २६ धावा फटकावून अापल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यानं अवघ्या ३.२ षटकांत कोलकाताला ४० धावा फटकावून दिल्या. त्यानंतर ख्रिस लिन अाणि नितीश राणा यांनी कोलकाताच्या डावाला अाकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या.


ख्रिस लिनची झुंज व्यर्थ

सुरुवातीपासून किल्ला लढवत ख्रिस लिनने कोलकाताच्या विजयाची पायाभरणी केली. पण विजयाच्या आशा पल्लवित झाल्यानंतर कोलकाताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली. ख्रिस लिनने ३१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. पण राॅबिन उथप्पा (२), कर्णधार दिनेश कार्तिक (८) आणि आंद्रे रस्सेल (३) यांनी निराशा केल्यामुळे कोलकाताचा पराभव निश्चित झाला. १८ चेंडूंत ३९ धावांची गरज असताना शुभमन गिल आणि पीयूष चावला यांनी प्रतिकार केला, पण कोलकाताला विजयासाठी १३ धावा कमी पडल्या. 



हेही वाचा -

राजस्थान ‘एलिमिनेट’, कोलकाताची सनरायझर्सशी उपांत्य लढत

चेन्नईकडून हैदराबादचा ‘सूर्यास्त’, सातव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा