'ते' मालाडमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना लुबाडायचे!


'ते' मालाडमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना लुबाडायचे!
SHARES

बेकायदेशीर काॅल सेंटर चालवून 'इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेस'चे अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.


'असा' उघड झाला प्रकार

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साहिल यांना मालाड पश्चिमेकडील काचपाडा येथे बेकायदेशीर काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जगदीश यांनी या ठिकाणी छापा टाकला असता या काॅलसेंटरमधील आरोपी लॅपटाॅप आणि कम्प्युटरच्या मदतीने इंटरनेटद्वारे 'व्हॉईस ओव्हर इंटरनेट काॅल' करून अमेरिकेतल्या नागरिकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं.


'अशी' सुरू होती फसवणूक?

ही टोळी अमेरिकेतील नागरिकांना 'युनायटेड स्टेट ट्रेझरी डिपार्टमेंट'मधून बोलत असल्याचं सांगून 'इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेस' विभागाच्या नावाने टॅक्स जमा करण्यास सांगायचे. टॅक्स न भरल्यास कायदेशीर कारवाईची धमकी देखील द्यायचे. यावेळी बेकायदेशीररित्या टॅक्स जमा करण्यासाठी विविध गिफ्ट व्हाऊचर्स खरेदी करण्यास अमेरिकेतील नागरिकांना ते भाग पाडायचे, नंतर हे गिफ्ट व्हाऊचर्सचे पैशात रुपांतर करायचे, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. 


कोट्यवधींची फसवणूक

अशा प्रकारे नेमकी किती अमेरिकन नागरिकांची फसवणूक आतापर्यंत करण्यात आली, हे सांगणं कठीण असलं तरी हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे.


'हे' साहित्य जप्त

या कॉल सेंटरवर छापा टाकून गुन्हे शाखेने ८ सीपीयू, ९ लॅपटाॅप, २ वाय फाय राऊटर, १४ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या प्रकरणी मालाड आणि बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत या सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा - 

विविध कंपन्यांच्या स्किमद्वारे फसवणूक झालेल्यांना दिलासा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा