13/7 बॉम्बस्फोट : 'त्यांना' जगण्यासाठी हवाय भक्कम आधार...


13/7 बॉम्बस्फोट : 'त्यांना' जगण्यासाठी हवाय भक्कम आधार...
SHARES

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाला यंदा 6 वर्षे पूर्ण होत आहेत. काही दिवसांपूर्वीच 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटाचे निकाल जाहीर झाल्याने मुंबईकरांवरील जबर आघाताच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.


येथे घडले बॉम्बस्फोट

13/7 ही तारीख मुंबईकरांच्या काळजाला झालेल्या खोल जखमेपैकीच एक आहे. या दिवशी मुंबईचे व्यापारी केंद्र अशी ओळख असलेल्या झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर या तीन ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते.

यापैकी पहिला बॉम्बस्फोट झवेरी बाजाराच्या खाऊ गल्लीत संध्याकाळी 6.45 वाजता, दुसरा स्फोट ऑपेरा हाऊस येथील टाटा रोडवर संध्याकाळी 6.55 वाजता, तर तिसरा स्फोट दादरच्या कबुतर खाना येथे संध्याकाळी 7.08 वाजता झाला. या तिन्ही स्फोटात 26 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर 130 हून अधिकजण जखमी झाले होते.



कमावती व्यक्ती गमावली

दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी आपापल्या घरी परतायच्या तयारीत असलेल्या अनेकांना आपण यापुढे आपल्या कुटुंबाला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही, याची पुसटशीही जाणीव नव्हती. यापैकीच एक होते ऑपेरा हाऊस येथे हिऱ्यांचा व्यापार करणारे संदिप चंपकलाल शहा.

नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांना भेटून संदिप शहा घरी परतण्यास निघालेले असतानाच टाटा रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटात ते सापडले आणि त्यांच्या कुटुंबाने आपला आधारवड गमावला. या घटनेला 6 वर्षे पूर्ण होत आली तरीही शहा कुटुंब या धक्क्यातून सावरू शकलेले नाही. एकमेव आधारस्तंभ गमावल्यानंतर शहा कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी अजूनही सुरळीत होऊ शकलेली नाही.



आर्थिक सुबत्तेचे दिवस गेले

संदिप शहा हिरे व्यापारी असल्याने त्यांच्या घरात पूर्वीपासूनच आर्थिक सुबत्ता होती. पण ते गेल्यानंतर त्यांची पत्नी कंकन शहा आणि शाळेत शिकणाऱ्या लहान मुलापुढे आता जगायचे कुणाच्या आधारे? असा मोठा प्रश्न पडला. कारण दोघांनाही केवळ एकमेकांचाच आसरा उरला हाेता.

बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मिळणारा मदतनिधी शहा कुटुंबाला देण्यात आला. केंद्र सरकारकडून 3 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख, मंत्रालय आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून जमा केलेेले 7 लाख, असे एकूण 15 लाख रुपये शहा कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. पण मागच्या 6 वर्षांमध्ये दैनंदिन गरजा आणि मुलाचा शिक्षणखर्च यावर सगळी रक्कम खर्च झाल्याने शहा कुटुंबापुढे पुन्हा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

घरातील कमावती व्यक्ती गेल्यानंतर सरकारने दिलेल्या मदतीच्या आधारे शहा कुटुंबाने सहा वर्षे कशीबशी घालवली खरी. पण जगण्यासाठी त्यांना भक्कम आधार आजपर्यंत मिळू शकला नाही, असे कंकन शहा यांना वाटत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून मुलाला नोकरी आणि राहण्यासाठी घर मिळावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. त्यांच्या मागणीला सरकार दाद देते की नाही यावरच आता सारे अवलंबून आहे.


सरकारच्या निधीने आम्हाला आधार मिळाला. पण दैनंदिन खर्च आणि मुलाच्या शिक्षणावर हे पैसे खर्च झाले. त्यामुळे आम्हाला पुन्हा आर्थिक हालाखीचा सामना करावा लागत आहे. सध्या माझा मुलगा हिंदुजा महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत आहे. टाटा ट्रस्टकडून दरमहा 5 हजार रुपयांची पेन्शन आणि शिक्षणखर्च मिळत असला, तरी आजच्या महागाईच्या तुलनेत तो तुटपुंजा ठरत आहे. त्यामुळे माझ्या मुलाला शिक्षण घेतानाच नोकरीही करावी लागत आहे. म्हणूनच सरकारने आम्हाला घर, मुलाला नोकरी आणि मेडिक्लेम द्यावा. जेणेकरून जगण्यासाठी आम्हाला भक्कम आधार मिळेल.
कंकन शहा, 13/7 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मृताची पत्नी



हे देखील वाचा -

असा मिळाला 257 जीवांना न्याय...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा