मुस्तफा डोसाचा रुग्णालयातच मृत्यू; फाशीआधीच नियतीचा न्याय


मुस्तफा डोसाचा रुग्णालयातच मृत्यू; फाशीआधीच नियतीचा न्याय
SHARES

मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला मुस्तफा डोसा याचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे मंगळवारी सीबीआयने डोसाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी डोसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

''पाहिजे तर आपल्याला आयुष्यभर तुरूंगात खडी फोडायला पाठवा, पण फाशी देऊ नका'', अशी काही दिवसांपूर्वीच डोसाने न्यायालयाकडे याचना केली होती. मात्र अडीचशेहून अधिक जाणांचे प्राण घेणाऱ्या या क्रूरकर्माला बचावाची कुठलीही संधी द्यायची नाही, या उद्देशानेच जणू फाशी व्हायच्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातली.


छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात

आर्थर रोड कारागृहात असलेल्या डोसाला मंगळवारी रात्री छातीत दुखायला लागले. त्याला तापही असल्याने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले.

जे. जे.तील डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला 'युरीन ट्रेक इन्फेक्शन' झाल्याचे आणि मधुमेह वाढल्याचे आढळले. मात्र सकाळी साडेअकरा वाजता डोसाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला तात्काळ 'सीसीयू'त हलवण्यात आले.


दुपारी अडीच वाजता मृत घोषित

डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करुनही तो वाचू शकला नाही. डॉक्टरांनी डोसाला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मृत घोषित केल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली.


मुस्तफा डोसाचा मृत्यू नैसर्गिक आहे. याकूबला फाशी दिल्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र हा मृत्यू नैसर्गिक असल्यामुळे तशी गरज वाटत नाही. तरी देखील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.


- रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री


याकुबपेक्षा महत्त्वाची भूमिका

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात डोसाची भूमिका याकूबपेक्षाही महत्त्वाची असल्याचे मंगळवारी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी न्यायालयाला सांगितले होते.

डोसा हाच या स्फोटांमागील प्रमुख 'मास्टरमाइंड' असून त्यानेच आपल्या साथीदारांना हे स्फोट घडवण्याचे आदेश दिले होते.

मुस्तफा आणि त्याचा मोठा भाऊ मोहम्मद डोसा यांनीच स्फोटांचे नियोजन करण्यासाठी पहिली बैठक बोलावली होती, असे देखील सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.


स्फोटांमागचा 'ड्रायव्हिंग फोर्स'

या स्फोटांमागे डोसा 'ड्रायव्हिंग फोर्स' होता. स्फोट घडवून आण्यासाठी डोसाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाठवला होता. त्याचबरोबर त्याने आरोपींना स्फोट घडवून आणण्यासाठी प्रशिक्षण देखील दिले होते.



हे देखील वाचा -

असा मिळाला 257 जीवांना न्याय...


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा