हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना अटक

 Malad West
हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना अटक
Malad West, Mumbai  -  

मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगरमध्ये एका दूध विक्रेत्याकडे 60 हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तीन तोतया पोलिसांना बांगूर नगर पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे. संतोष मोरे, समीर धुळे आणि कृष्णा बंडी अशी या तीन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजू एव्हरशाईन नगर परिसरात दूधाच्या पिशव्या विकण्याचे काम करतो. 3 मे रोजी सकाळी दूधाच्या पिशव्यांचे वाटप करत असताना तीन अनोळखी इसम त्याच्याजवळ आले. त्यानंतर या तिघांनी राजूवर दूधात भेसळ करत असल्याचा आरोप करण्यास सुरूवात केली. 'आम्ही तिघेही पोलीस असून कारवाईपासून वाचायचे असल्यास 60 हजार रुपये दे', अशी धमकीही या तिघांनी राजूला दिली.

या तोतया पोलिसांच्या धमकीला घाबरलेल्या राजूने थेट बांगूर नगर पोलीस ठाणे गाठत झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन संतोष मोरे, समीर धुळे आणि कृष्णा बंडी या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांवर कलम 385, 384, 170 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना बोरिवली न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.    

आरोंपीचे म्हणणे आहे की, ते तिघेही एका स्वयंसेवी संस्थेत काम करणारे असून त्यांना एव्हरशाईन नगरमध्ये दूधात पाणी मिसळले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे गेल्यावर दूधातील भेसळीचे प्रकरण उघडकीस येण्याच्या भितीने तक्रारदाराने त्यांना तोतया पोलीस बनून हप्ता मागण्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे.

Loading Comments