मालवणीत ४७ वर्षीय महिलेची हत्या

मंगळवारी सकाळी रात्रपाळी करून दीपक घरी आला त्यावेळी घराचा दरवाजा त्याला अर्धवट उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर आई अंथरूणावर झोपली असेल असं त्याला वाटलं.

SHARE

मालाड मालवणी परिसरात ४७ वर्षीय महिलेची हत्या करून चोरांनी घर लुटल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. कांचन गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मालवणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्या आणि लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मालवणीच्या कलेक्टर कंपाऊडमध्ये कांचन गुप्ता यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्यामुळे त्या २५ वर्षीय मुलगा दिपक सोबत राहत होत्या. दीपक हा कॉल सेंटरमध्ये नोकरी असून सोमवारी रात्री रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. मंगळवारी सकाळी रात्रपाळी करून दीपक घरी आला त्यावेळी घराचा दरवाजा त्याला अर्धवट उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर आई अंथरूणावर झोपली असेल असं त्याला वाटलं. आईला त्याने उठवण्याचा प्रयत्न केला असता ती काही प्रतिसाद देत नव्हती. तिच्या गळ्याभोवती लाल वण पाहून आईची हत्या झाल्याचा त्याला संशय आल्याने त्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.

शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तपासात कांचन यांच्या अंगावरील सोनसाखळी, कर्णफुले दिसून आली नाही. तर कपाटातील १ लाख ५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. चोरीच्या उद्देशानेच अनोळखी आरोपींनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात पुढं येत असून  या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीवर माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट

SRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, प्रकृती नाजूक
संबंधित विषय
ताज्या बातम्या