विधानसभा निवडणुकीवर माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट

अस्तित्वाच्या लढाईत टिकून राहण्यासाठी यापूर्वी निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी गोळीबार, स्फोट अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गट्टा परिसरात निवडणूक केंद्राजवळच स्फोट घडवून आणला होता.

विधानसभा निवडणुकीवर माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट
SHARES

बॅलेट लोकशाहीपेक्षा बुलेट (बंदूक) वर विश्वास करणाऱ्या माओवाद्यांचा विधानसभा निवडणुकीत नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात हिंसक कारवाया घडवून आणण्याचा डाव आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा दारूगोळा लक्षात घेता, माओवाद्यांनी दिवाळीनिमित्त उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांचा वापर करून घातपात करण्याचा कट आखला आहे. शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर फटाके खरेदी करून आणण्याच्या सूचना अतिदुर्गम भागातील त्यांच्या समर्थकांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील वल्गना नक्षली प्रत्येक निवडणुकीदरम्यान करतात. यासाठी लोकांमध्ये, निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करतात. अस्तित्वाच्या लढाईत टिकून राहण्यासाठी यापूर्वी निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी गोळीबार, स्फोट अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गट्टा परिसरात निवडणूक केंद्राजवळच स्फोट घडवून आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तोच पठारी भाग असलेल्या सततच्या वर्दळीच्या कुरखेडा ते पुराडा मार्गावरील जांभुळखेडाजवळ बॉम्बस्फोट घडवून आणून, पोलीस जवानांना घेऊन जाणारे वाहन उडविलं होतं. यात क्यू. आर. टी.चे १५ जवान व वाहनचालक, असे एकूण १६ जवान शहीद झाले होते.

नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊ नये म्हणून माओवाद्यांनी कट  रचल्याची कुणकूण सुरक्षा यंत्रणांना लागली  आहे. माओवाद्यांकडे शस्त्रसाठा मर्यादित असतो. बंदुकीच्या गोळ्या अथवा स्फोटकांवर नाहक खर्च होऊ नये, याची ते फार काळजी घेतात. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षली बरेचदा पोलिंग पार्टी (निवडणूक पथक) वर अथवा पोलिसांवर बंदुकीतून दोन ते चार गोळ्या झाडतात आणि लगेच मोठ्या आवाजाचे सुतळी बॉम्बसारखे फटाके फोडतात. जंगलात मोकळी जागा असल्याने याचा आवाज दूरपर्यंत जातो. या आवाजामुळे लोकांमध्ये दहशत तर निर्माण होतेच. शिवाय नक्षल्यांजवळ मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे, असंही पोलिसांना वाटतं.  मात्र या कारवाईसाठी दारूगोळा कमी पडू शकतो. यासाठी नक्षलवाद्यांचे दोन ते तीन दलम सहा ते सात दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागातील एका गावात गेले होते. तेथील लोकांना त्यांनी शहरी भागात जाऊन दिवाळीच्या बहाण्याने फटाके खरेदी करून आणण्यास सांगितल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे नक्षली प्रभुत्व असलेल्या ठिकाणी निवडणूक केंद्रांवर विशेष सुरक्षा तैनात करण्याच्या सूचना गृहखात्याकडून देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

SRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, प्रकृती नाजूक

भिकाऱ्याच्या झोपडीत सापडली लाखोंची चिल्लर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा