भिकाऱ्याच्या झोपडीत सापडली लाखोंची चिल्लर

शुक्रवारी पिरबीचांद आझाद या भिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ओळख पटवण्यासाठी पोलिस या वृद्धाच्या घरी गेल्यानंतर त्यांना ही चिल्लर सापडली.

भिकाऱ्याच्या झोपडीत सापडली लाखोंची चिल्लर
SHARES

मानखुर्दमध्ये एका भिकाऱ्याच्या १० बाय १० च्या झोपडीत पोलिसांना चक्क दीड लाख रुपयांची चिल्लर सापडली आहे. एवढंच नाही तर या झोपडीत बँकेतील मुदत ठेवींची कागदपत्रेही सापडली आहेत. जवळपास साडेआठ लाख रूपयांच्या या ठेवी आहेत. ही झोपडी पिरबीचांद आझाद (७०) या वृद्ध भिकाऱ्याची आहे. 

शुक्रवारी पिरबीचांद आझाद या भिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ओळख पटवण्यासाठी पोलिस या वृद्धाच्या घरी गेल्यानंतर त्यांना ही चिल्लर सापडली.  पिरबीचांद हा मूळचा राजस्थानमधील असून अनेक वर्षापासून तो मुंबईतील मानखुर्द येथील झोपडपट्टीत राहतो. दिवसभर रेल्वे स्थानक, मंदिर, मस्जिद येथे भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी रात्री रूळ ओलांडत असताना त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मृतदेहाच्या अंगावरील फाटके कपडे आणि जवळ कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे  पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील रुळालगत असणाऱ्या एका झोपडपट्टीत पिरबीचांद याची झोपडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वृद्धाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी शनिवारी वाशी रेल्वे पोलिसांनी त्याचं घर गाठलं.

तुटलेला दरवाजा असलेल्या आणि पत्र्याने झाकलेल्या झोपडपट्टीची पोलिसांनी झडती घेतली असता पोलिसांचं लक्ष एका कोपऱ्यात ठेवलेल्या चार गोण्यांकडं गेलं. पोलिसांनी गोणीचे तोंड खोललं असता त्यात  चिल्लर भरून ठेवलेली दिसली.   तर एका पत्र्याच्या पेटीत काही कागदपत्रेही सापडली. त्यात बँकेतील ठेवींची कागदपत्रे आणि बँकेचे पासबुक होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेली चिल्लर पाहून पोलिसही चक्रावले होते. पंचनामा करण्यासाठी घरात आढळून आलेल्या प्रत्येक गोष्टींची  माहिती पंचनाम्यात लिहिणं बंधनकारक असल्यामुळे सर्व तपास अधिकारी दिवसभर चिल्लर मोजत होते. तर वृद्धाच्या पेटीत मिळालेल्या कागदपत्रांद्वारे त्याने बँकेत ८ लाख ७७ हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्याचं उघडकीस आलं.   या आधी कल्याणमध्ये एका १०  बाय १० च्या खोलीत असाच खजिना सापडला होता. कल्याणच्या लहूजी नगर येथील मोहने परिसरात एका भिकाऱ्याच्या झोपडीला आग लागली होती. त्यावेळी आग विझवताना त्याच्या खोलीत गोणी भरून पैसे मिळाले होते.  



हेही वाचा - 

पीएमसीच्या माजी अध्यक्षाला अटक, गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा