करायची होती गुन्ह्यांची सेंच्युरी, पोहोचला तुरुंगात!


करायची होती गुन्ह्यांची सेंच्युरी, पोहोचला तुरुंगात!
SHARES

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी भांडण करत, त्यांना लुबाडणाऱ्या भुरट्या चोराला गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीत त्याच्यावर 23 गुन्ह्यांची नोंद असल्याचे पुढे आले. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर गुन्ह्यांची सेंच्युरी करण्याच्या नादात हा चोर पुन्हा पोलिसांच्या तावडीत अडकला आहे.


झटपट श्रीमंत व्हायचा नाद नडला

घाटकोपरच्या सुशिक्षित कुटुंबात राहणारा किरण शाह झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चोरीकडे वळाला. रस्त्यावर येता जाता नागरिकांशी भांडण करून त्यांचे लक्ष विचलित करून तो नागरिकांच्या किंमती वस्तू चोरायचा. सीएसटी येथे एप्रिल 2016 मध्ये एका गुन्ह्यात आझाद मैदान पोलिसांनी किरणला रंगेहाथ अटक केली. त्यावेळी त्याने पोलिसांना 27 गुन्ह्यांची कबुली दिली. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली खरी, मात्र जामिनावर बाहेर येत त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरूवात केली.


९१ गुन्हे झाले, सेंच्युरी हुकली

नुकतेच वांद्रे येथे एका तरुणाशी भांडण काढून किरणने त्याला लुटले होते. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रीत केले. तपासात किरणचा मित्र कमलेश जयसिंह छोटई याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कमलेशच्या चौकशीतून किरणचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वांद्रे येथील गुन्ह्यांची किरणने कबुली दिली खरी, मात्र मागील दहा महिन्यांत आपण 91 गुन्हे अशा प्रकारचे केले असून लवकरच शतक पूर्ण करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी कपाळाला हात मारला!


महिलांनाही करायचा हिप्नोटाईज

पोलिसांकडून असे सांगितले जाते की, पूर्वी किरण महिलांना एकट्यात गाठून त्यांना हिप्नोटाइज करून लुटत होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर तो न्यायालयात गुन्ह्यांची कबूली द्यायचा. त्यामुळे न्यायालय त्याला तीन-चार महिन्यांची शिक्षा सुनवायचे. मात्र, त्याची आई त्याला जामिनावर सोडवायची. बाहेर आल्यावर किरण पुन्हा चोऱ्या करायचा. शहरातील निम्म्याहून अधिक पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

मैत्रीच्या नावाला काळिमा, मित्राचा मृतदेह भिकाऱ्यांमध्ये झोपवून काढला पळ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा