तिकीट विक्री करणाऱ्या अनधिकृत दलालांविरुद्ध रेल्वे पोलिसांची कारवाई


तिकीट विक्री करणाऱ्या अनधिकृत दलालांविरुद्ध रेल्वे पोलिसांची कारवाई
SHARES

मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या राज्यभरातील अनधिकृत दलालांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी २०२० मध्ये ४६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४९२ दलालांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पावणेतीन कोटी रुपये किमतीची १४ हजार ३४३ तिकिटे हस्तगत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवल्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ या विभागांत वर्षभरात केलेल्या कारवाईत ४६६ गुन्हे दाखल झाले. एकूण १४,३४३ तिकिटे जप्त करण्यात आली असून त्यात १४ हजार ०६५ ई-तिकिटे आणि २७८ तिकीट खिडक्यांवरील तिकिटांचा समावेश आहे.

४६६ प्रकरणांपैकी २५३ गुन्हे हे मुंबई विभागात दाखल झालेले असून एक कोटी ४३ लाख रुपये किमतीची सात हजार तिकिटे जप्त करण्यात आली. यामध्ये सहा हजार ८६३ ई-तिकिटे आणि १३९ तिकीट खिडक्यांवरील तिकिटांचा समावेश आहे. मुंबई विभागात एकूण २६२ जणांना अटक केली आहे.

ई-तिकीट काढण्यासाठी अनधिकृत दलालांकडून विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यामुळे तिकिटे अधिक झटपट काढली जातात. रेल्वे स्थानकातील पीआरएस तिकीट खिडक्या सुरू होताच रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून काही सेकंदांतच तिकिटे आरक्षित केली जातात. अनेकदा अधिकृत दलालही त्यांना ई-तिकीट काढण्यासाठी दिलेल्या वैयक्तिक आयडीचा गैरपावर करतात.

आयआरसीटीसीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेनुसार जास्त तिकिटे काढतात. त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेआधीच वैयक्तिक आयडीवरून तिकीट काढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा