कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, 'जे जे'मधील निवासी डॉक्टरला अटक

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या कारनं दिलेल्या धडकेत एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता.

कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, 'जे जे'मधील निवासी डॉक्टरला अटक
SHARES

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या कारनं दिलेल्या धडकेत एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निवासी डॉक्टरला अटक केली आहे. त्याला कोर्टानं १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आदित्य देसाई (वय २७) असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.  रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दक्षिण मुंबईतील केम्पस कॉर्नर इथल्या उड्डाणपूलावर हा अपघात झाला. आरोपी डॉक्टर रेहान रशीद (वय २७) हा बाबूलनाथहून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं कार चालवत होता. या दरम्यान त्यानं नियम मोडत दुसऱ्या मार्गिकेत प्रवेश करत समोरून येणाऱ्या बाइकला धडक दिली.

यात बाइकस्वार आदित्य हा उड्डाणपुलावरून ३० फूट खाली कोसळला. या घटनेनंतर कारचालक आरोपी डॉक्टर आणि इतर बाइकस्वारांनी त्याला तातडीनं जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

या अपघातात आदित्यला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर, मंगळवारी सकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपी निवासी डॉक्टरच्या अटकेसाठी गावदेवी पोलीस ठाण्यात मृत आदित्य देसाईचे नातेवाईक आणि मित्रांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलनात सहभाग घेत आरोपीच्या अटकेची मागणी केली.

अखेर मंगळवारी रात्री पोलिसांनी आरोपी निवासी डॉक्टर रेहान रशीदला अटक केली. बुधवारी, आरोपीला गिरगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टानं त्याला एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

क्रुरतेचा कळस! बोरिवलीमध्ये १० कुत्र्यांना भिंतीत गाडलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा