स्वस्तातलं म्हाडाचं घर पडलं महागात, डाॅक्टरची ७४ लाखांना फसवणूक

म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचं प्रलोभन दाखवत डॉक्‍टरची ७४ लाखांची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

स्वस्तातलं म्हाडाचं घर पडलं महागात, डाॅक्टरची ७४ लाखांना फसवणूक
SHARES

मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळेच की काय प्रत्येक जण तुटपूंजी रक्कम बाजूला काढून पैसे साठवत असतो. मात्र हेच स्वस्तातलं घर अनेकदा महागातही पडतं. याची प्रचिती पवईत राहणाऱ्या एका डाॅक्टरला आली आहे. म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचं प्रलोभन दाखवत डॉक्‍टरची ७४ लाखांची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

प्रलोभन दाखवलं

मुंबईतल्या नामांकित शासकिय महाविद्यालयात कार्यरत असलेले तक्रारदार डाॅक्टर हे मुंबईत घर शोधत होते. त्याच वेळी त्यांच्या एका मित्राने त्यांची एका इस्टेट एजंटशी ओळख करून दिली. पवईत म्हाडाचा प्रकल्प सुरू असून मंत्रालयीन कोट्यातून स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो, असं प्रलोभन त्या एजंटने दाखवलं. म्हाडाच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची ओळख असल्याचीही बतावणी करत त्याने डॉक्‍टरकडून ६८ लाख ८८  हजार रुपये उकळले. म्हाडाच्या फ्लॅटची बनावट कागदपत्रेही त्याने त्या डॉक्‍टरला दिली.

गुन्हा दाखल

त्यामुळे डॉक्‍टरांचा त्याच्यावर विश्‍वास बसला. काही दिवसांनी घाटकोपर इथंही एक घर स्वस्तात उपलब्ध असल्याचं सांगत त्याने या डॉक्‍टरकडून ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर मात्र त्या इस्टेट एंजटने डॉक्‍टरचा फोन उचलणे बंद केलं. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर त्या डॉक्‍टरने पवई पोलिस ठाण्यास तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी संबंधित इस्टेट एजंट आणि त्याच्या ४ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.



हेही वाचा-

बोगस टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

काॅ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा