तर माझा नवरा जिवंत असता, अक्षता नाईक यांचा अर्णबवर आरोप

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

तर माझा नवरा जिवंत असता, अक्षता नाईक यांचा अर्णबवर आरोप
SHARES

अर्णब गोस्वामी यांच्या कंपनीकडून केलेल्या कामाचे पैसे मिळाले असते, तर आज माझा नवरा जिवंत असता. माझ्या पतीने सुसाइट नोटमध्ये अर्णब गोस्वामीसहित तीन जणांची नावं लिहिली होती. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. महाराष्ट्र पोलिसांनी आज केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते, अशा शब्दांत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (anvay naik wife akshata naik allegations on arnab goswami)

यावेळी अक्षता नाईक यांनी सांगितलं की, अर्णब गोस्वामी यांच्या एआरजी आउटलायर या कंपनीचा मुंबईतील स्टुडिओ उभारण्याचं काम माझ्या पतीने केलं होतं. परंतु या कामाचे ८३ लाख रुपये त्यांनी थकवले. तुला पैसे मिळणार तर नाहीच, पण जे मिळालेत ते पण मी वसूल करतो, अशी धमकी देत अर्णबने देणं शिल्लक असलेल्या इतर ग्राहकांशी संपर्क साधून त्यांनाही आमच्याविरोधात भडकवलं. त्यामुळं आमचे कामगार सोडून चालले होते. इतर कामंही मिळत नव्हती. अर्णबने सूडबुद्धीने हे सर्व केलं. माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते आज जिवंत असते.

हेही वाचा- अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई- चंद्रकांत पाटील

पैशांवरून अर्णबकडून सातत्याने आमच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यावरून आमची पोलिसांत तक्रार करण्याविषयी चर्चाही झाली होती. परंतु मुलीचं करिअरही उद्ध्वस्त करण्याची अर्णबने धमकी दिली होती. मार्केटमध्ये दुसरी कामं घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे रिपब्लिकचं काम हेच त्यांचं शेवटचं प्रॉजेक्ट होतं, वडिलांपुढे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचललं, असं अन्वय नाईक यांच्या मुलीने सांगितलं.

माझ्या पतीने अर्णब गोस्वामीसह तीन जणांची नावं सुसाईड नोटमध्ये घेतली होती. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पोलीस उपमहासंचालकांच्या कार्यालयात नेऊन त्यांचा जबाबत नोंदवण्यात आला. अर्णव गोस्वामीला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आली, असा आरोपही अन्वया नाईक यांनी केला.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीवर कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

हेही वाचा- 'त्या' प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा