पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकाला अटक


पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकाला अटक
SHARES

मुंबई ही दहशतवाद्यांच्या कायम केंद्रस्थानी राहिली आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांसह इतर सुरक्षाव्यवस्थांनी दहशतवाद्यांविरोधात फास आवळण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळेच पाकिस्ताननं आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी इंटरनेटच्या मदतीनं भारतीय तरुणांची जातीच्या नावाखाली माथी भडकावून त्यांना परदेशात दहशतवादी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पाकिस्तानमधून दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि मुंबईत स्फोट घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटनं मुंबईतून अटक केली आहे. बेहरामबाग इथं राहणाऱ्या या युवकाचं नाव फैझल मिर्झा असं अाहे. 


इंडियन मुजाहिद्दीनसाठी करायचा काम?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैझल मिर्झा हा प्रशिक्षण घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडे गेला असल्याचे कळते. तसंच अामीर रझा खान या इंडियन मुजाहिद्दीनच्या प्रमुखानं फैझलला प्रशिक्षण दिल्याचं कळतं. फैझलच्या चौकशीतून तो मुंबईत असलेल्या केमिकल्स कंपन्यांमध्ये स्फोट घडवणार असल्याचेही समजते. तसंच 'अलोन वुल्फ' हल्ला (गर्दीच्या ठिकाणी एकट्यानेच दहशतवादी हल्ला घडवून अाणणे) करण्याच्या तो तयारीत होता. सध्या लंडन, फ्रान्समध्ये अशाचप्रकारचे हल्ले दहशतवाद्यांकडून होत अाहेत.


जोगेश्वरीत इलेक्ट्रिशियनचं काम करायचा

जोगेश्वरी परिसरात राहणारा हा संशयित आरोपी यापूर्वी इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. एवढच नव्हे तर तो मोबाइलहूनही सांकेतिक भाषेत बोलायचा. भारतात किंवा मुंबईत दाखल होणं तितकंसं शक्य नसल्यामुळे या दहशतवादी संघटनांनी त्याला परदेशात बोलवून आत्मघातकी शस्त्रं कशी हाताळायची आणि कसा त्याचा वापर करायचा, याचं प्रशिक्षण घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी बोलावलं होतं.


शारजा-दुबईमार्गे गेला कराचीत

आरोपीवर कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्याला सुरुवातीला शारजा इथं बोलवण्यात आलं होतं. त्याठिकाणी काही दिवस मुक्काम केल्यानंतर त्याला नंतर दुबईमार्गे कराची इथं पाठवण्यात आलं. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेत तीन महिन्यांचं प्रशिक्षण त्यानं पूर्ण केल्याचं समजतं. या प्रशिक्षणादरम्यान त्याला शस्त्र चालवणं, बाँम्ब बनविणं, आत्मघाती हल्ले करणं, आगी लावणं इत्यादींचं प्रशिक्षण देण्यात आलं.


जोगेश्वरीतून केली अटक

या प्रशिक्षणादरम्यान आरोपीला देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, शहरातील महत्त्वाची ठिकाणं, आणि आवश्यक सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांवर हल्ला करण्याचा कट रचण्याचं प्रशिक्षण देण्यात अालं होतं. संबधित आरोपी प्रशिक्षण घेऊन मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर जुहू पोलिसांनी जोगेश्वरी येथील त्याच्या राहत्या घराजवळून त्याला अटक केली आहे.


मोबाइलमध्ये सापडले संशयास्पद क्रमांक

या आरोपीजवळून त्याचे पुढील मनसुबे काय आहेत. तसेच देशातील त्याच्या अन्य साथीदारांची ओळख पटवण्याचं काम पोलिस करत आहेत. पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद नंबर आणि माहिती सापडल्याने दहशतवादविरोधी पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहे. न्यायालयानं त्याला २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर पोलीस नजर ठेवून होते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात तो गेल्या अनेक वर्षांपासून होता. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नव्हे तर तो स्वतःच्या फोनवरूनही पाकिस्तामधील दहशतवाद्यांशी संपर्क साधायचा. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्याचा त्याचा हेतू होता.
- अतुलचंद्र कुलकर्णी, एटीएस प्रमुख


हेही वाचा -

मुंबई आॅन हायअलर्ट!

व्यसनासाठी चोरी ते खंडणीचा प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा