अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

तिघे दुपारी १ वाजताच्या सुमारास अक्सा बिचवर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांना समुद्राच्या खोलीचा अंदाज आला नाही. खवळलेल्या समुद्राने त्यांना आत खेचले.

अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
SHARES

मालाडमध्ये मालवणी येथे अक्सा समुद्र किनाऱ्यावर बुडालेल्या तीन मुलांपैकी दोघांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत हर्ष गौड (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईतून अनेक जण अक्सा बीचवर फिरण्यासाठी येत असतात. मंगळवारी दुपारी हर्ष गौड (१५),  सत्यम यादव (१५), धिरज गुप्ता (१३) हे तिघे दुपारी १ वाजताच्या सुमारास अक्सा बिचवर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांना समुद्राच्या खोलीचा अंदाज आला नाही. खवळलेल्या समुद्राने त्यांना आत खेचले. वेळीच जीवरक्षकांची नजर या तीन बुडणाऱ्या मुलांवर पडल्याने त्यांनी धाव घेतली. जीवरक्षकांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून तिघांना बाहेर काढले. मात्र हर्ष बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला जवळील एमएस हमला रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

धोकादायक अक्सा बीच

 मुंबईतील सर्वच चौपाट्यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रकार अधूनमधून घडत असले तरी यापैकी अक्सा बीच सर्वात जास्त धोकादायक ठरत आहे. अक्सा बीचवर सरकत्या वाळूमुळे किनाऱ्याजवळ तयार होणारे खड्डे या जीवघेण्या अपघातांचे मुख्य कारण आहे. भरती-ओहोटीमुळे हे खड्डे तयार होतात. खड्डयात पाऊल गेले की ती व्यक्ती आत खेचली गेल्याने पाण्यातून बाहेर पडणे कठीण होते. पाण्याला प्रवाह असल्याने कितीही चांगले पोहता येत असले तरी खड्डय़ात पाय गेल्यानंतर त्यातून बाहेर कसे पडायचे ते कळत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत खेचले गेल्याने जीव जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण येथे मोठय़ा संख्येने येतात. काही जण भर समुद्रात क्रिकेट, फुटबॉल, पळापळी खेळतात. हे करताना आपण समुद्रात किती खोलवर जातोय, याचे भान त्यांना राहत नाही आणि ते जेव्हा भानावर येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा