कार्ड क्लोनिंगचे गुन्हे ५ वर्षात वाढले ५ पटीने

बहुतांशी चोरीच्या गुन्ह्यात बनावट कार्ड बनवून परदेशात विविध वस्तूंची खरेदी करत नागरिकांना लुबाडले जाते. या टोळीतील व्यक्ती हॉटेलमधील एखाद्या वेटरला पैशाचे आमीष दाखवून क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकाचा डाटा स्किमरच्या साहाय्याने कॉपी करण्यास सांगतात.

कार्ड क्लोनिंगचे गुन्हे ५ वर्षात वाढले ५ पटीने
SHARES

डेबिट व क्रेडिट कार्ड क्लोनिंगद्वारे सर्व सामान्यांची होणारी लूट थांबवण्यात मुंबई पोलिस सपशेल अपयशी ठरले आहे. कार्ड क्लोनिंगद्वारे नागरिकांची फसवणूक केल्याचे गुन्हे मागील पाच वर्षात पाच पटीने वाढले आहेत. नाही म्हटलं तरी दिवसाला ६० ते ७० जणांची अशाप्रकारे फसवणूक होत असून पोलिस ठाण्यात या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातुलनेत गुन्हे उकल होण्याचे प्रमाण हे निम्याहून कमी आहे.  एकीकडे सरकार आॅनलाईन व्यवहारांसाठी आग्रह धरत असताना, दुसरीकडे मात्र नागरिकांच्या सुरक्षेबाबतचे पाऊल उचलण्यात सरकार उदासीन असल्याचे दिसून येते.


कसं होतं कार्ड क्लोनिंग

क्लोनिंगचे गुन्हे करताना आरोपी नवनवीन शक्कल लढवत असून पोलिसांपेक्षा त्याच्याजवळ अत्याधुनिक यंत्रणा आहेत. पोलिसांनी नुकतीच दिल्लीतून या गुन्ह्यात एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून ही टोळी क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या हाती येण्यापूर्वीच त्याचा डेटा चोरी करत असल्याचे उघडकीस आले. बँकेत नवीन खाते उघडल्यानंतर डेबीट व क्रेडिट कार्ड आणि खाते संबंधीची इतर माहिती बँकेकडे उपलब्ध असते.

या सर्व खात्यांची जलदगतीने इंट्री करण्यासाठी बँक हे काम कंत्राटी स्वरूपात कॉल सेंटरला देते. अशाच कॉल सेंटरमधून खातेदारांची माहिती या चोरट्यांना छुप्या पद्धतीने काही हजारात पुरवली जाते. त्यानुसार हे चोरटे मोबाइलद्वारे नागरिकांना फोन करून विश्वास संपादन करत त्यांच्याकडून डेबीट व क्रेडिट कार्डचे पीन नंबर, ओटीपी नंबर आणि इतर माहिती घेतात. त्यानंतर त्यांची फसवणूक करतात. या फसवणुकीत वयोवृद्ध आणि गृहिणींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

 

चोरट्यांचे कॉल सेंटर

मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात महिन्याला अशा २०० ते ३०० गुन्ह्यांची नोंद होते. तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वर्षाला हजाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद होते. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ठरावीक नंबरचा शोध घेत पोलिस त्यांची यादी संबंधीत कंपनीकडे सेवा खंडित करण्यासाठी देतात. मात्र पोलिसांच्या यादीतून एखाद्या निरपराध व्यक्तीचा नंबर खंडित होण्याची शक्यता वर्तवत कंपनी हे नंबर बंद करत नाही. २०१७ मध्ये डेबिट व क्रेडिटकार्डचे ४०० गुन्हे नोंदवण्यात आले होते. तर २०१८ मध्ये ४६१ गुन्ह्याची नोंद आहे. या सर्व फसवणुकी दिल्ली (नोएडा), कोलकत्ता, राजस्थान येथून केली जाते. विशेष म्हणजे या राज्यात अशा चोरट्यांचे मोठे कॉल सेंटर असून त्या ठिकाणीहून अशा चोऱ्या केल्या जातात.


सहकार्य नाही

८ ते १० हजारात मुलांना कामाला ठेवून प्रत्येक एका फसवणुकीमागे त्यांना वाढीव पैसे दिले जात असल्याचे आरोपींच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आहे. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सायबर पोलिसांकडून वेळोवेळी बँक आणि मोबाइल कंपन्यांना आवाहन केले जाते. मात्र त्याच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने या गुन्ह्यांना रोखणे पोलिसांना कठीण जात असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

 

हाॅटेलमध्ये सावधान

बहुतांशी चोरीच्या गुन्ह्यात बनावट कार्ड बनवून परदेशात विविध वस्तूंची खरेदी करत नागरिकांना लुबाडले जाते. या टोळीतील व्यक्ती हॉटेलमधील एखाद्या वेटरला पैशाचे आमीष दाखवून क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकाचा डाटा स्किमरच्या साहाय्याने कॉपी करण्यास सांगतात. त्यानंतर या टोळीतील एक गट प्रथम हा चोरी केलेला डेटा व ग्राहकाने वापरलेला पिन क्रमांक याचे संकलन करतो. त्यानंतर दुसरा गट डाटा व पिन क्रमांकाच्या साहाय्याने नवीन क्रेडिट कार्ड तयार करतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची महत्वाची माहिती कुणालाही सांगू नये. किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरताना नागरिकांनी काळजी घ्यावी.

 

 बँकांची विश्वासहर्ता धोक्यात

 क्लोनिंगच्या या प्रकारामुळे कार्डधारकाच्या केवळ पैशाचेच नुकसान होत नसून, बँकांवरील त्यांच्या विश्वासालाही तडा जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे क्रेडिट अथवा डेबिट कार्डला पिन क्रमांक देण्यात यावा, कार्ड पोस्टाने घरी पाठवण्याऐवजी प्रत्यक्ष कार्डधारकाच्या हातात कार्ड द्यावे, तसेच कार्ड बनवण्याचे काम बाहेरच्या एका कंपनीला देण्याऐवजी बँकांनी स्वत:च त्यांचे कार्ड बनवावे, सिमकार्डप्रमाणेच नवीन कार्ड जारी करताना पूर्वीचे कार्ड ‘डिअ‍ॅक्टिवेट’ होईल, अशी एखादी यंत्रणा तयार करण्यात यावी  अशा सूचना पोलिसांनी बॅँकेला दिल्या आहेत.


चीप वापरावी

पोलिसांनी आरोपींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असे निदर्शनास आले की, कार्ड क्लोनिंग करताना क्लोनिंग करण्यात आलेल्या नवीन कार्डमध्ये जुन्या कार्डमधील माहिती ‘अपडेट’ करण्यात येते. त्यामुळे सारख्याच क्रमांकाचे अथवा माहितीचे कार्ड अस्तित्वात आल्यानंतर ते कार्ड ‘डिअ‍ॅक्टिवेट’ झाल्यास क्लोनिंगवर लगाम लावणे शक्य होईल, अशी माहिती एका अधिका-याने दिली. त्याचबरोबर सध्या क्रेडिट कार्डमध्ये मॅग्नेटिक पट्टीचा वापर केला जातो. त्याच्याऐवजी चीपचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. मॅग्नेटिक पट्टीमधील माहिती तंत्राचा वापर करून सहज कॉपी करता येऊ शकते. मात्र चीपमधील माहिती ‘इनस्क्रिप्टेड फॉरमॅट’मध्ये असल्यामुळे तिची क्लोनिंग करणे शक्य होत नाही.

 

फसवणूक अशी टाळावी

 नागरिकांच्या सतर्कतेमुळेही सायबर क्लोनिंगवर लगाम लावणे शक्य होऊ शकते. त्यासाठी डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करताना प्रत्यक्षात स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोकर अथवा इतर व्यक्तींच्या मार्फत ‘एटीएम’मधून रक्कम काढल्यास कार्डचा गैरवापर होऊ शकतो. याशिवाय ऑनलाइन रक्कम भरताना कार्ड क्रमांकाची माहिती देणे टाळा. त्यामुळे सायबर क्लोनिंग थांबवता येणे शक्य आहे. 


पोलिसांचं आवाहन

१) आपले क्रेडिट कार्ड, त्याचा क्रमांक, पिन क्रमांकाची माहिती मित्र, नातेवाईक यांना कधीही फोनवरून सांगू नका. गरज असल्यास लघुसंदेशाचा वापर करा.

२) कुठलीही बँक फोनवरून कार्डविषयी महत्त्वाची माहिती विचारत नाही, अशा प्रकारे कुणी विचारल्यास थेट बँकेशी संपर्क साधा.

३) कार्ड स्वाइप करताना वापरले जाणारे मशीन निरखून पाहा. त्याला अतिरिक्त मशीन किंवा रीडर बसवलेला नाही हे पाहा.

४) हॉटेलमध्ये कधीही कार्ड स्वाइप करण्यासाठी दुसऱ्याचा हाती देऊ नका, स्वत:हून जाऊन स्वाइप करा.

 

आकडेवारी

वर्ष            गुन्हे

२०१९        १२६ (मार्चपर्यंत)

२०१८        ४६१

२०१७        ४००

२०१६         २५७

२०१५         ३२०

२०१४        १८३



हेही वाचा - 

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ड्रीम इलेव्हनच्या सीईओची १० लाखांना फसवणूक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा