ठाणे महानगरपालिकाच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०,२८६ व ३४ प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे.ओमसाई आरोग्य केयर प्रा.लि येथे 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत असणारे डॉ. परवेझ, श्रीमती नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशी आरोपींची नावे आहेत.
ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णालयाने दीड लाखाची रक्कम घेऊन एका रुग्णाला अॅडमिट करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने गुरुवारी हा प्रकार उघडकीस आणला होता. महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
गुरूवारी रात्री बारा- साडेबाराच्या सुमारास मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वसईतील एका रूग्णास दीड लाख रूपये घेऊन दाखल करण्यात आलं होतं. या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असून पैसे मंत्र्यांपर्यंत जातात असं त्यांना सांगण्यात आलं. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. हे रेकॉर्डींग अविनाश जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठवले होते.
हेही वाचा -
वाहनांवर स्टिकर लावण्याचा आदेश अवघ्या ७ दिवसांत रद्द
बनावट ओळखपत्रावर अनेकांचा लोकल प्रवास; रेल्वे पोलिसांकडून धरपकड