देवनार डम्पिंग ग्राऊंडमधून सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला

वारंवार आग लावण्याचे प्रकार घडू लागल्यानंतर त्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. प्रशासनाने या भागात लाखो रूपये खर्च करून तब्बल ४० सीसीटीव्ही लावले.

देवनार डम्पिंग ग्राऊंडमधून सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीमुळे झालेल्या प्रदूषणाचा त्रास संपूर्ण मुंबईला सोसावा लागला होता. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागली होती. आग लावणाऱ्या काही जणांना कालांतराने पोलिसांनी अटकही केली. पण पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात अाले. मात्र, अाता चोरट्यांनी या सीसीटीव्ही कॅमेरांवरच डल्ला मारला अाहे. त्यामुळे येथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात अाहेत. 


४० सीसीटीव्ही लावले

देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये मार्च महिन्यात दोन वेळा आग लावण्यात अाली होती. आगीमुळे देवनार, मानखुर्द, गोवंडी, चेंबूरसह संपूर्ण मुंबईत धुराचं साम्राज्य पसरलं होतं. नागरिकांना कुबट श्वसनाचा त्रासही झाला होता. आग आटोक्यात आणून धूर कमी करण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यासह सुगंधी रसायनांचा फवाराही मारण्यात आला होता. वारंवार आग लावण्याचे प्रकार घडू लागल्यानंतर त्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. प्रशासनाने या भागात लाखो रूपये खर्च करून तब्बल ४० सीसीटीव्ही लावले.


५ सीसीटीव्ही चोरीला 

सप्टेंबर महिन्यात ४० पैकी ५ सीसीटीव्ही चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबर चोरट्यांनी २५ बॅटऱ्या, १२ स्वीच, १० नेटवर्क कंट्रोल पॅनेलही चोरलं अाहे. ही चोरी परिसरात फिरणाऱ्या गर्दुल्यांनी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती झोन ६ चे  पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.



हेही वाचा -

साकीनाक्यात शौचालयाचं दार ठोठावल्यानं एकाची हत्या

कारवाईचा सूड घेण्यासाठी वाहतूक पोलिसाचीच दुचाकी पळवली




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा