सराईत चोराला पोलिसांनी केली अटक

 Pratiksha Nagar
सराईत चोराला पोलिसांनी केली अटक

शिव - वर्दळीच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या युवकाला सायन पोलिसांनी 29 डिसेंबरला सापळा रचून अटक केली. कासीम मुख्तार इराणी (20) असं त्या तरुणाचं नाव असून तो सराईत चोर असल्याचं सायन पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. त्याने मुंबईतल्या सायन, माटुंगा, भोईवाडा, ठाणे, कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 पेक्षा जास्त सोनसाखळी चोरीच्या घटना केल्याचं उघड झाल्यानं सायन पोलीस अधिक तपास करत आहेत.

सराईत चोर कासीम मुख्तार इराणी चोरी करताना नेहमी आपला साथीदार बदलत होता, शिवाय रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर चुकवून अत्यंत सावधगिरीने चोरी करत असल्यानं पोलिसांच्या तपासाची दिशा बदलत होती. गेल्या कित्येक महिन्यापासून हा सराईत चोर पोलिसांना चक्मा देत होता. त्यामुळे या चोराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर होती. मंगळवारी सायंकाळी शीव परिसरात आपले शिकार शोधण्यासाठी रस्त्यावर संशयास्पद हालचाल करत फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मोहन जगदाळे आणि त्यांच्या पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने आपण येथे आल्याचं त्याने कबूल केलं.

Loading Comments