Exclusive : अजब चोरीची गजब कहाणी! तरुणांचा सापळा आणि चोर जाळ्यात

एखाद्या चित्रपटात असावी अशीच या चोरीमागील स्टोरी आहे. गोरेगाव इथली ही घटना आहे.

Exclusive : अजब चोरीची गजब कहाणी! तरुणांचा सापळा आणि चोर जाळ्यात
SHARES

आतापर्यंत पोलिसांनी चोराला पकडले असे ऐकले असेल. पण गोरेगाव इथे काही तरूणांनी चोराला पकडले आणि पोलिसांच्या हवाले केल्याचा प्रकार समोर आला आहे. एखाद्या चित्रपटात असावी अशीच या चोरीमागील स्टोरी आहे. गोरेगाव इथली ही घटना आहे.  

गोरेगाव इथल्या व्हँलेंटाईन अपार्टमेंटजवळ चोराने रिक्षा चालकाला धमकावले आणि रिक्षातून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर रिक्षा घेऊन पसार झाला होता. रिक्षा चालक यांनी तात्काळ त्यांचा मुलाशी संपर्क साधला. त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेतली आणि सगळा प्रकार कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

यासर्व प्रकारानंतर रिक्षा चालकाने पोलिस स्टेशन गाठले. आधी दिंडोशी पोलिस स्टेशनला ते गेले. पण ही घटना कुरार व्हिलेज पोलिस ठाण्याअंतर्गत येते असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी कुरार व्हिलेज पोलिस स्टेशन गाठले. कुरार पोलिस स्टेशनमध्ये त्यांना सांगण्यात आले की, दोन दिवसांनी एफआयआर दाखल करू पण आम्ही तपास सुरू करू. रिक्षा नंबर आणि इतर माहिती घेऊन त्यांना घरी पाठवले.

पण या घटनेनंतर रिक्षा चालक यांच्या मुलाला काही चैन पडत नव्हती. रिक्षाचे भाग वेगळे करून विकले जातील की काय याचीच भिती त्याला सतावत होती. अखेर त्याने पुढाकार घेत स्वत: तपास सुरू केला. चोरी झालेल्या स्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज आहेत का? याची पाहणी केली. यासाठी काही दुकाने त्याने पालथी घातली जेणेकरून काही सुगावा लागेल.

एका सीसीटीव्हीत रिक्षा फिल्मसिटीच्या दिशेने जाताना दिसली. पुढे अधिक तपास केल्यावर कळाले की, चोर फिल्मसिटीतील एका सेटवर क्रू असल्याची बतावणी करून जेवला होता. पण त्याच्या पुढे काही सुगावा लागत नव्हता. पण त्यांच्या मुलाने प्रयत्न सुरू ठेवले.

रिक्षा चोरीला गेल्याच्याच रात्री रिक्षा चालकाला आरोपी संतोष नगर परिसरात दिसला. त्यांनी लगेच मुलाला बोलावून घेतले. पण मुलगा येण्याआधी त्या चोराने धमकावून पुन्हा एकदा रिक्षा चालकाचा मोबाईल हातातून खेचला. तसेच त्यांना धमकी दिली की, तुम्ही माझे काही करू नाही शकणार. नशीब समजा तुम्हाला मी सोडतोय. कुणाला काही सांगितले तर लक्षात ठेवा, असे बोलून तो तिकडून पसार झाला.

दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाने पुन्हा पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पण पोलिस दोन दिवसांनी एफआयआर दाखल करू यावरच ठाम होते. पण आम्ही तपास करत आहोत असेही सांगत होते.

अखेर रिक्षा चालकाच्या मुलाने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर एका मुलाकडे त्याचा फोटो सापडला. त्या मुलाने देखील एका प्रकरणात त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे समोर आले.

चोरी प्रकरणात काहीच होत नसल्याचे बघून त्याने आणि गोरेगाव पूर्व दिंडोशी परिसरात राहणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत आमदार सुनील प्रभू यांच्याकडे धाव घेतली. आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी आणि कुरार व्हिलेज पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि याप्रकरणी लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पण तो चोर पुन्हा एकदा संतोष नगर परिसरात दिसल्याचे मित्राकडून कळाले. त्यानंतर इतर मित्रांसोबत त्यांनी त्यास्थळी धाव घेतली. पण यावेळी त्यांनी पोलिस येईपर्यंत त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. यासाठी तो आणि त्याच्या मित्राने वेगवेगळ्या मार्गांवर पाळत ठेवली. काही जण त्याचा पाठलाग करत होती. तर काही तो जाण्याची शक्यता असलेल्या मार्गांवर पाळत ठेवून होती.

चोराने रिक्षा पकडली आणि गोरेगाव इथल्या एका बारजवळ थांबवली. सुट्टे आणतो अशी बतावणी करून तो चोर गेला. पण बराच वेळ आला नाही. अखेर किती वेळ थांबणार? शेवटी बिचारा रिक्षा चालक निघून गेला. पण मुलांच्या टोळीची त्याच्यावर करडी नजर होती. सगळा प्रकार ते पाहत होते.

कुरार व्हिलेज पोलिसांना त्यांनी कळवले होते. पण बराच वेळ कुणी आले नाही. शेवटी पुन्हा एकदा त्यांनी कॉल केला. पोलिस निघाले असल्याचे त्यांना सांगितले. पण आता त्या चोराला संशय यायला लागला. तो पळण्याच्या तयारीतच होता. पण पोरांनी एकत्र धाव घेत त्याला पकडले आणि दिंडोशी पोलिसांच्या हवाले केले.

दिंडोशी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समोर आले की, गॅस संपल्यामुळे त्याने रिक्षा कांदिवलीला ठेवली आहे. तसेच त्याच्याकडून ३ चोरीचे मोबाईल सापडले. याशिवाय तो नशेडी असल्याचेही समोर आले. दिंडोशी पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवला आणि चोराला तुरुंगात डांबले.

तरुणांनी दाखवलेल्या हिमतीमुळे रिक्षा चालकाला रिक्षा मिळाली. सर्व स्तरातून या तरूणांचे कौतुक होत आहे.    



हेही वाचा

ठाण्यातील मिट्रॉन लाउंज सील, क्रिकेटपटूही लाउंजमध्ये होता उपस्थित

व्हॉट्सअॅप प्रोफाइलमध्ये औरंगजेबचा फोटो वापरणारा पोलिसांच्या ताब्यात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा