सिद्धिसाई इमारत दुर्घटना : कॉन्ट्रॅक्टरला पोलीस कोठडी


सिद्धिसाई इमारत दुर्घटना : कॉन्ट्रॅक्टरला पोलीस कोठडी
SHARES

घाटकोपरच्या सिद्धिसाई इमारत दुर्घटनेचा मुख्य सूत्रधार सुनील शितप याच्यापाठोपाठ इमारतीच्या तळमजल्यावरील अनधिकृत कामावर देखरेख ठेवणारा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अनिल मंडल (२८) याला पार्कसाईट पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. या दोघांना रविवारी भाईवाडा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनील शितप याच्या नर्सिंग होमच्या दुरूस्तीचे काम मंडल कॉन्ट्रॅक्टर म्हणून पहात होता. शितप आणि आर्किटेक्ट रणजीत आगळे यांच्या सूचनेनुसार तो मजुरांकडून दुरूस्तीचे काम करवून घेत होता.

ज्या तळमजल्यावर दुरूस्तीचे काम सुरू होते तेथील पिलर हटवल्यास दुर्घटना होऊ शकते, याची कल्पना असून देखील मंडल याने पिलर हटवले. त्यामुळे दुर्घटनेस जबाबदार ठरवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मंडल याच्याकडे आर्किटेक्चरची कुठलीही पदवी नसून आगळे आर्किटेक्ट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु इमारत दुर्घटना झाल्याच्या दिवसापासून आगळे फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मंडल याच्या अटकेनंतर तळमजल्यावर कुठल्या प्रकारचे काम सुरू होते याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चार मजली सिद्धिसाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा मृत्यू; तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.


पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत

इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची आणि जखमींना मोफत उपचारांसहित १ लाखांची मदत देण्याची घोषणा विधानसभेत केली होती.





हे देखील वाचा -

अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा