नवोदित कलाकारांना लुटणारा सहनिर्माता अटकेत


नवोदित कलाकारांना लुटणारा सहनिर्माता अटकेत
SHARES

तुम्हाला अभिनयाची आवड असेल आणि कोणी तुम्हाला चित्रपटात किंवा जाहिरातीत अभिनय करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगत असेल तर सावध व्हा! नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. कारण याच पद्धतीचा अवलंब करत नवोदित कलाकारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या नामकिंत प्रोडक्शन हाऊसमधील सह निर्मात्याला पोलिसांनी अटक केली आहे. जिग्नेश कोळी असं या सहनिर्मात्याचं नाव आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


या तरुणाची फसवणूक

मूळचा साताऱ्यातील रहिवासी असलेला श्रीपाद जोशी (२२), याला चित्रपटात काम करायचं होतं. त्यासाठी लागणारं प्रशिक्षण त्याने नामांकित महाविद्यालयातून घेतलं होतं. या-त्या मित्राच्या ओळखीने तो जिग्नेशच्या संपर्कात आला.

टिटवाळा परिसरात राहणाऱ्या जिग्नेशची काही कारणास्तव नोकरी सुटली होती. त्यामुळे जिग्नेशने चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा खूप दबदबा असून आपल्या शब्दावर तुला सिनेमात काम मिळणार असं आमीष श्रीपादला दाखवलं.


संपूर्ण प्रकार

15 मार्च रोजी एका मोबाइल कंपनीच्या जाहिरातीसाठी एक अॅक्टर हवा असल्याचं सांगून त्याने श्रीपादला मुंबईला बोलवून घेतलं. 10 एप्रिल रोजी श्रीपाद जिग्नेशला दादरच्या एका हॉटेलमध्ये भेटला असता हॉटेलच्या काऊन्टरवरून त्याला काही तरी आणण्यास सांगितलं. श्रीपाद ते आणण्यासाठी गेल्यानंतर जिग्नेशने त्याचा मोबाईल आणि बॅग घेऊन तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर श्रीपादने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी जिग्नेशला अटक केली. न्यायालयाने जिग्नेशला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


त्याने अनेकांना गंडवलं?

जिग्नेशच्या चौकशीत त्याने नोकरी सुटल्यामुळे आपण हा चोरीचा मार्ग पत्कारल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यासाठी अभिनेता, अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुण-तरुणींची मुंबईत कमी नाही. अशा मुलांचे प्रोफाइल शोधून त्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल, कॅफे या ठिकाणी बोलावायचा आणि त्यांच्याकडूनच खाण्यापिण्याचा खर्च कराययचा. त्यानंतर काही काम सांगून त्यांना बाहेर पाठवून त्यांच्या महागड्या वस्तू घेऊन तो पसार होत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. जिग्नेशने अशा प्रकारे अनेकांना गंडवल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहे.


हेही वाचा -

अनिकेतने प्रेक्षकांनाच घातला गंडा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा