लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना

लाॅकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना घडल्या असून यात ४११ आरोपींना अटक केल्याची माहिती राज्याच्या पोलीस विभागाने दिली आहे.

लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना
SHARES

कोरोनाचा (coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात लोकांनी घरातच राहावं, घराबाहेर पडू नये, यासाठी जागोजागी पोलिसांचा (maharashtra police) कडक पहारा आहे. तरीही काही ठिकाणी लोकं घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये चकमकी उडत आहेत. यातूनच लाॅकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना घडल्या असून यात ४११ आरोपींना अटक केल्याची माहिती राज्याच्या पोलीस विभागाने दिली आहे.

२ कोटींची दंडवसुली

पोलीस विभागाच्या माहितीनुसार, लाॅकडाऊनच्या (lockdown) काळात राज्यात कलम १८८ नुसार ५७ हजार ५१७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ हजार १२३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. संचारबंदी असूनही रस्त्यावर वाहने काढल्याबद्दल ४० हजार ४१४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या १०५१ वाहनांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा - मुंबईत हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या वाटणार, फक्त यांनाच?

पोलिसांना कोरोना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ११ पोलीस अधिकारी, ३८ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळले आहेत. अशा सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

सोशल मीडिया गुन्हेगारी

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर सेलने २४२ गुन्हे दाखल केले असून ४७ जणांना अटक केली आहे. तर आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ११० गुन्हे, फेसबुक पोस्ट्स शेअर प्रकरणी ८२, टिक टाॅक व्हिडिओ शेअर प्रकरणी ४, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी ३, तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४१ गुन्हे दाखल. यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश आल्याचं पोलीस विभागाने सांगितलं.

गृहमंत्र्यांचं आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन  करण्यात आलेलं आहे. या काळात सर्व नियमांचं पालन करणं म्हणजे स्वत:च्या आणि सामाजिक हिताचं संरक्षण होय, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी केलं.

सरकारने लावलेले निर्बंध वैयक्तिक तसंच सामाजिक हितासाठीच करण्यात आलेले आहेत. मात्र वारंवार सांगून, विनंती करुनही काही लोकं नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकं विनाकारण लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याची जाणीव संबंधित लोकांनी ठेवावी. त्यांच्याविरुद्ध कडक  कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. 

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याचं 'हे' आहे कारण

लॉक डाऊन पाळणं हे आपल्या सार्वजनिक हिताचं आहे. पोलीससुद्धा माणूस आहे. स्वत:च्या सुरक्षेचं विचार न करता पोलीस कर्मचारी तासनतास अत्यंत विषम व प्रसंगी धोकादायक परिस्थिती मध्ये काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेली निर्देश मानावेत. पोलीस, आरोग्य कर्मचारी व प्रशासनाला घरी राहूनच सहकार्य करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा