'डॅडी' पुन्हा तुरुंगाबाहेर

  Mumbai
  'डॅडी' पुन्हा तुरुंगाबाहेर
  मुंबई  -  

  मुंबईचा डॉन अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फर्लो मंजूर केला. त्यासोबतच संचित रजा नामंजूरीला कारणीभूत ठरणारी 2016 ची अधिसूचनादेखील मागे घेण्यात येईल, असे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्यामुळे त्याआधारे गवळीला संचित रजा देण्यात आली आहे.

  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या गवळी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कुटुंबियांना भेटता यावे म्हणून त्याने 28 दिवसांच्या संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे मार्च महिन्यात अर्ज केला होता. मात्र, मार्च महिन्यात राज्यात विशेषतः मुंबईत महापालिका निवडणूक होणार होती. त्या कालावधीत गवळीला संचित रजा देण्यात आली तर, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असता असे कारण देत उपमहानिरीक्षकांनी त्याचा अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गवळी याने उच्च न्यायालयात दाखल केली होती.

  दरम्यान, राज्य सरकारने गवळीच्या अर्जाचा न्यायालयात विरोध केला. शासनाने अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजा (फर्लो) नियमात सुधारणा केली. तसेच 28 ऑगस्ट 2016 ला त्याबाबत अधिसूचना काढली. आरोपीने शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील केले असेल आणि सदर अपील प्रलंबित असेल तर आरोपीला संचित रजा देता येणार नाही, अशी तरतूद करण्यत आली आहे. त्या तरतुदीच्या आधारे राज्य सरकारने गवळीच्या संचित रजेच्या अर्जाचा विरोध केला. दरम्यान डॅडी बाहेर येणार ही बातमी कळताच दगडी चाळीत जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.