फेसबुकवरील मैत्री पडली साडे आठ लाखात

 Vikhroli
फेसबुकवरील मैत्री पडली साडे आठ लाखात

विक्रोळी - फेसबुकचा वापर मित्र जोडण्यासाठी होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. विक्रोळीत राहणाऱ्या एका तरुणीलाही अशाच एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महागात पडले आहे. या तरुणीला वाढदिवसाचे गिफ्ट चक्क साडे आठ लाखाला पडले आहे. नक्कीच तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या तरुणीची फसवणूक झाली आहे ती महिला एका पोलीस अधिकाऱ्याचीच मुलगी आहे.

विक्रोळी परिसरात राहणाऱ्या अपूर्वा (बदललेले नाव) नावाच्या तरुणीची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मायकल फिंच नावाच्या इसमाशी ओळख झाली. काही दिवसातच दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. दोघांनी ही आपले मोबाईल नंबरही एकमेकांना दिले. ऑगस्ट महिन्यात अपूर्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मायकलने मोठे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. त्यानुसार दिल्ली इंदिरा गांधी विमानतळावरून अपूर्वाला फोनही आला. तुमच्या नावाचे कुरियर आले असून ते घेण्यासाठी तुम्हाला १९ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागेल, असा दावा या कस्टम अधिकाऱ्याने केला. मात्र अपूर्वाने याकडे दुर्लक्ष केले. शिवाय मायकलने गिफ्टचे फोटो पाठवले. पण, याकडे देखील अपूर्वाने दुर्लक्ष केले.

प्लॅन यशस्वी होत नाही हे पाहून मायकलने युक्ती लढवली. त्याने सुमित शर्माच्या नावाने रिझर्व्ह बॅंकेकडून मेल पाठवला आणि एक फॉर्म भरून राजस्थान आणि दिल्लीच्या आरबीआयच्या बँक खात्यात साडे आठ लाख रुपये भरण्यास अपूर्वाला सांगितले. आता मात्र अपूर्वाने मायकलच्या म्हणन्यानुसार बँकेत पैसे भरले. मात्र तिने पैसे भरताच मायकलचा फोन तर बंद झालाच. त्याचे फेसबुक अकाउंटही गायब झाले. अखेर अपूर्वाने विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. "आम्ही माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, असे विक्रोळी पोलिसांनी सांगितले.

Loading Comments