मानसिक रुग्णाची हत्या, एकाच कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा

 Kandivali
मानसिक रुग्णाची हत्या, एकाच कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा

मानसिक रुग्णाची हत्या केल्याप्रकरणी कांदिवलीतील चारकोप पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संजय गंगा सिवरे (24) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारकोप येथील भांब्रेकर नगर परिसरात राहणारा संजय सिवरे हा मानसिक रुग्ण अधूनमधून सुनील मोहिते (54) यांच्या घरी जात असे. बुधवारी असाच तो मोहिते यांच्या घरी गेलेला असताना त्याने तहान लागल्याने पाणी मागितले. सुनील यांची मुलगी तेजस्वीनी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. त्यानंतर तो तेजस्वीनीकडे एकटक पाहू लागला. तेजस्वीनीला त्याचा राग आल्याने झालेला प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. हे ऐकताच मोहिते कुटुंबीयांनी संजयला बाम्बू आणि लाकडाने मारहाण करत चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजयला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

त्यानंतर चारकोप पोलिसांनी सुनील मोहिते यांच्यासहित, मुलगी तेजस्वीनी, मुलगा विशाल, अजित, पत्नी कलावती तसेच आणखी एकाविरोधात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी माेहिते कुटुंबीयांविरोधात भादंविच्या 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Loading Comments