प्रेमप्रकरणातून मुलगी घर सोडून पळून गेल्याने नैराश्येत असलेल्या ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंचाराम रिठाडीया असं या पित्याचं नाव आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.चेंबूर
कुर्लाच्या ठक्कर बापा काॅलनीत पंचाराम रिठाडीया दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत राहत होते. एकच मुलगी असल्यामुळे पंचाराम यांचा तिच्यावर जीव होता. लहानपणापासून इतर भावंडांपैक्षा ते तिचे लाड जास्त करायचे. मुलगी आता काॅलेजला जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या वागणुकीतील बदल पंचाराम यांच्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांना जाणवत होता. वारंवार चोरून मोबाइलवर बोलणं, काॅलेजवरून उशिरा येणं हे सर्वांनी हेरलं होतं. मात्र, पंचाराम यांचा मुलीवर असलेल्या विश्वासामुळे त्यांनी ही गोष्ट फारशी गांभिर्याने घेतली नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांची ही १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी पळू गेल्यामुळे पंचाराम दुखी होते.
समाजात मुलगी परपुरुषासोबत पळून गेल्याची कुजबुज चालू होती. पंचाराम यांना अनेकांकडून टोमणेही ऐकावे लागले होते. त्यामुळे नैराश्येत असलेल्या पंचाराम यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं. सोमवारी दुपारी पंचाराम यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वडाळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचाराम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. वडाळा रेल्वे पोलिसांना मृत पंचाराम यांच्याजवळ स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात त्याने एका महिलेसह काही व्यक्तींची नावे लिहिली आहेत. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
इन्स्टाग्राममुळे 'त्या' बेपत्ता मुलींचा लागला शोध
पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडीच्या निशाण्यावर