चेंबुरचं 'ते' वसतीगृह एफडीएच्या तपासणीत दोषी


चेंबुरचं 'ते' वसतीगृह एफडीएच्या तपासणीत दोषी
SHARES

चेंबुर - सामाजिक न्याय विभागाच्या चेंबुरमधील वसतीगृहाच्या मेसची आणि स्वयंपाकघराची अन्न आणि औषध प्रशासनाने सोमवारी तपासणी केली. या तपसाणीत कंत्राटदारांकडून अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता दिसून आली असून अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न शिजवण्यासाठी असं वातावरण योग्य नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आता एफडीएच्या कारवाईच्या कचाट्यातही वसतीगृह आणि कंत्राटदार अडकणार आहेत.

रविवारी दुपारी वसतीगृहातील जेवणात पाल आढळली होती. या प्रकरणाची पोलीस आणि समाजकल्याण विभागाकडून चौकशी सुरू आहेच. पण अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एफडीएनेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार सोमवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी वसतीगृहातील मेस आणि स्वयंपाकघराची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल्याने आता कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई, सुरेश अन्नपुरे यांनी दिली आहे. या नोटीशीनुसार पंधरा दिवसात अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत तर कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार कंत्राटदाराचा परवाना निलंबित वा कायमचा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असंही अन्नपुरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराची हकालपट्टी झाली तरी नवीन येणाऱ्या कंत्राटदारांकडूनही स्वयंपाकघर, मेस स्वच्छ ठेवली जाते की नाही यावर एफडीएची करडी नजर असणार आहे.

विद्यार्थ्यांची आबाळ सुरूच..

रविवारी जेवणात पाल आढळल्यापासून संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतीगृहातील मुलांची खाण्यापिण्याची आबाळ सुरू झाली आहे. विद्यार्थी रविवारपासून बाहेर जेवत असून दररोज बाहेर जेवण परवडणारे नसल्याने सोमवारी रात्री कंत्राटदाराकडून विद्यार्थ्यांनी पुलाव बनवून घेतला. तर मंगळवारचा नाश्ताही विद्यार्थ्यांना मिळाला नसल्याची माहिती वसतीगृहातील विद्यार्थी गोरख उबाळे याने दिली आहे. कंत्राटदाराची हकालपट्टी करत नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया जोवर पूर्ण होत नाही तोवर विद्यार्थ्यांचे हाल असेच सुरू राहणार आहेत. त्यामुळे आता तरी शिक्षणमंत्री याकडे लक्ष देतील का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय