विनापरवाना ऑर्थोपेडिक उपकरण विकणाऱ्यांच्या मुसक्या एफडीएने आवळल्या


विनापरवाना ऑर्थोपेडिक उपकरण विकणाऱ्यांच्या मुसक्या एफडीएने आवळल्या
SHARES

स्टेन्टसह अन्य वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीच्या काळाबाजाराचा पर्दाफाश काही महिन्यांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाने(एफडीए) केला होता. त्यानुसार मुंबईतील जी. टी. रुग्णालयासह राज्यभरातील 34 रुग्णालयांविरोधात खटले दाखल झाल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने खटले दाखल झाल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून एफडीएच्या या पाठपुराव्याचे आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.

वैद्यकीय उपकरणांसह ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची विक्री करण्यासाठी एफडीएचा परवाना बंधनकारक आहे. असे असताना मुंबईसह राज्यभर विना परवाना ऑर्थोपेडिक उपकरणांची खरेदी-विक्री केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार फेब्रुवारी 2017 मध्ये मुंबईतील जी. टी. रुग्णालयासह राज्यभरातील 39 रुग्णालयांमध्ये एफडीएने छापे टाकले होते. छापा टाकण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये जी. टी. रुग्णालयासह मुंबईतील पाच रुग्णालयांचा समावेश होता. पुण्यातील नऊ, कोकणातील सहा, औरंगाबाद सात, नाशिक सहा, अमरावती तीन आणि नागपुरमधील तीन रुग्णालयांचाही यात समावेश होता. या 39 रुग्णालयांपैकी 34 रुग्णालयांमध्ये विना परवाना ठेवण्यात आलेल्या ऑर्थोपेडिक उपकरणांचा कोट्यवधी रुपयांचा साठा सापडला होता. या कारवाईनुसार पोलिसांकडून याप्रकरणी खटले दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले आहे.

विना परवाना उपकरणांची खरेदी-विक्री केली जात आहे. पण त्याचवेळी ही उपकरणं आव्वाच्या सव्वा किंमतीत विकत रुग्णांची लुटही केली जात आहे. या धर्तीवर एफडीएची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून त्यामुळे विना परवाना ऑर्थोपेडिक उपकरणांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना चाप बसेल असा विश्वास जनआरोग्य चळवळीतील तज्ज्ञ उमेश खके यांनी व्यक्त केला आहे.

ऑर्थोपेडिक उपकरणांच्या या काळ्याबाजाराचा पर्दाफाश झाल्यानंतर उपकरणांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंतच्या व्यवहारांसाठी परवाना बंधनकारक आहे, असे सर्व रुग्णालयांना कळवण्यात आले. परवाना आहे की नाही यावर एफडीएचे लक्षही राहणार आहे. या कारवाईनंतर परवाना घेण्यासाठी रुग्णालये, उत्पादक पुढे येऊ लागले आहेत.

- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, एफडीए

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा