२०० हून अधिक नागरीकांची फसवणूक करणारे पोस्ट एजंट अटकेत

पोस्ट एजंटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार मुंबईत वाढले असून अशाच तीन जणांच्या टोळीला नुकतीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

२०० हून अधिक नागरीकांची फसवणूक करणारे पोस्ट एजंट अटकेत
SHARES

मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि भविष्याची तरतुद म्हणून काही ना काही गुंतवणूक करण्याकडे सर्वांचाच कल असतो. अशावेळी विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून अनेकजण पोस्टात पैसे गुंतवण्यास पसंती देतात. त्यानुसार पोस्टात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, नागरिकांनो यापुढे पोस्टात पैसे गुंतवताना थोडी काळजी घ्या. हो, कारण पोस्ट एजंटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार मुंबईत वाढले असून अशाच तीन जणांच्या टोळीला नुकतीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेले हे तिघेही पती-पत्नी आणि मुलगी असे एकाच कुटुंबातले आहेत. या तिघांना २६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून या तिघांनी २०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.


एकाच कुटुंबीतील सदस्य

माहिम परिसरात राहणाऱ्या भट कुटुंबातील रमेश भट (६५ वर्षे, पती), योगिता भट (५७ वर्षे,पत्नी) आणि भूमिका मोहिरे (३२ वर्षे, मुलगी) हे तिघे पोस्ट एजंट म्हणून काम करत होते. गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून ते पोस्टात जमा करण्याचं काम करायचे. मात्र या तिघांनी दीड वर्षांपूर्वी काही गुंतवणूकदारांचे पैसे पोस्टात जमा न करता स्वत:च वापरले. आपले पैसे पोस्टात जमाच केले नसल्याचं कळताच गुंतवणूकदारांनी या कुटुंबाच्या मागे तगादा लावला. गुंतवणूकदार घरी येऊ लागल्यानंतर या कुटुंबानं पैसे देण्यास टाळाटाळ केली.


नागरिकांची मोठी प्रमाणात फसवणूक

दरम्यान या कुटुंबाच्या फसवणूकीचे बळी पडलेल्यांमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश होता. या शिक्षिकेने विविध योजनांमध्ये गुंवतवण्यासाठी या कुटुंबाकडे २६ लाख रुपये दिले होते. पण या शिक्षिकेची रक्कम मिळण्यास उशीर झाल्यानं त्यांनी भट कुटुंबाकडे विचारणा केली. नेहमीप्रमाणे भट कुटुंबाने यांनाही टाळलं. त्यामुळे शेवटी या शिक्षिकेनं थेट पोस्ट कार्यालय गाठत चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण २६ लाखांच्या जागी या शिक्षिकेच्या नावावर केवळ ५ हजार रुपयेच जमा झाले होते. आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याबरोबर या शिक्षिकेने माहिम पोलिस ठाण्यात धाव घेत भट कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदवला.


मुंबईतून काढला पळ

आपल्या विरोधात गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतल्याचं समजताच भट कुटुंब मुंबईतून गायब झालं. पण पोलिस मात्र त्यांचा शोध घेत होते. गेली दीड वर्षे हे कुटुंब पोलिसांना गुंगारा देत होतं. मात्र अखेर पोलिसांना या कुटुंबाच्या मुसक्या आवळ्यात नुकतंच यश मिळालं आहे. मिरारोड परिसरातून माहिम पोलिसांनी या कुटंबाला अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे कुटुंब मिरारोडमध्ये राहत होतं. दरम्यान माहिम पोलिसांनी या कुटुंबाला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलं असून त्यांच्याविरोधात आता २०० जणांनी तक्रार दाखल केली आहे. तर या कुटुंबाने २०० जणांना तब्बल २० कोटींना फसवल्याची धक्कादायक बाबही आता समोर आली आहे.


मालमत्तांमध्ये गुंतवणूक

भट कुटुंबियांची चौकशी केली असता त्यांनी पोस्टाबरोबर हाॅलिडे नावाची गुंतवणूक योजना राबवत त्याद्वारेही अनेकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेत रक्कम गुंतवल्यास पनवेल इथंल्या भट कुटुंबियांच्या फार्म हाऊसवर मोफत राहण्याचं आमीष भट कुटुंबांकडून दाखवलं जात होत. दरम्यान या कुटुंबाने गुंतवणूकदारांना फसवून त्या पैशातून गोवा, पनवेल, मुंबई आणि डोंबिवली अशा पाच ठिकाणच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली होती. याप्रकरणी एमपीआयडी अंतर्गत आता भट कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात या मालमत्तांची विक्री करत तक्रारदारांचे पैसे देणे शक्य होणार असलं तरी मालमत्तांपेक्षा फसवणूकीची रक्कम मोठी असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितलं आहे. त्यामुळे तक्रारदारांची धाकधूक वाढण्याची शक्यत आहे. तेव्हा गुंतवणूकदारांनो पैसे गुंतवताना काळजी घ्या, अधिकृत एजंटद्वारेच पैसे गुंतवा असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

छोटा पेंग्विन खुश म्हणत निलेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

सावधान! जस्ट डाईलवर नंबर शोधणं 'असं' पडू शकतं महागात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा