मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहात आणखी चौघांना कोरोना

आतापर्यंत गतीमंद बालसुधारगृहाशी संबधीत ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात चार कर्मचा-यांचा समावेश आहे.

मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहात आणखी चौघांना कोरोना
SHARES

मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममध्ये ३० जणांना कोरोना झाल्याच्या बातमीनंतर एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर शेल्टर होम मधील मुलांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेला काही तास उलटत नाही तोच, आणखी चौघांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. त्यात तीन कर्मचा-यांसह एका गतीमंद मुलाचा सहभाग आहे. आतापर्यंत गतीमंद बालसुधारगृहाशी संबधीत ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात चार कर्मचा-यांचा समावेश आहे.

हेही वाचाः- कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठीही शेल्टर होम आहे. त्यात लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात येते. या सुधारगृहात सध्या २६८ व्यक्ती आहेत. त्यातील काहींना लक्षण आढळल्यामुळे ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील ३० व्यक्तींचे अहवाल  शनिवारी  प्राप्त झाले होते. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात पाच महिलांचाही समावेश होता. त्यानंतर आता बुधवारी आणखी ४ जणांचे कोरोना अहवालही पॉझीटीव्ह आले आहेत. त्यात मुलांची देखभाल करणारा कर्मचारी, एक स्वच्छता कर्मचारी, एक आचारी व एका गतीमंद मुलाचा समावेश आहे. यापूर्वीही येथील कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान कोरोनाची लागण झालेली मुले व अनेक कर्मचा-यांमध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप नेते किरीट सोमैया यांनी सोमवारी मानखुर्द बालसुधारगृहाची भेट घेतली आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. येथील कर्मचाऱ्यांना गेल्या ४ महिन्यापांसून पगारही मिळालेला नाही.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १२२३ नवे रुग्ण, दिवसभरात ५३ जणांचा मृत्यू

याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर सुधारगृहातील काही कर्मचा-यांचे एक महिन्यांचे पगार संस्था पातळीवर देण्यात आले आहेत. त्याप्रकरणी सोमैय्या यांच्या मार्फत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. कर्मचारी जीव मुठीत घेऊन कामे करत असताना त्यांना पगार नाही. तसेच पोलिसांप्रमाणे वीमा देखील देण्यात आलेला नाही. गतीमंद बालसुधारगृहात काम करणारे कर्मचारी व मानखुर्द बालसुधारगृहातील कर्मचारी एकाच कर्मचारी वसाहतीत राहतात. मानखुर्दच्या बालगृहामध्ये रक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा  कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच त्यावेळी दोन कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा