हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी देखील या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
SHARES

हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ४ आरोपींचं पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काऊंटर केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांकडून पोलिसांच्या शौर्याचे गोडवे गायले जात आहेत. तर काही जण हा प्रकार संशयास्पद समजून त्याच्या चौकशीची मागणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी देखील या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा- ‘या’ दोघांमुळे ठाकरे सरकारचे मंत्री बिनखात्याचे

या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, हैदराबादमध्ये पोलिसांनी ४ आरोपींचं ज्या प्रकारे एन्काऊंटर केलं, त्या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. देशात आरोपींना शिक्षा देण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच तपास झाला पाहिजे. या एन्काऊंटरमध्ये शंकेला बराच वाव आहे. पोलिस आरोपींना अशा प्रकारे संपवत असले आणि भावनेच्या भरात देशवासीयांकडून त्यांचं कौतुक होत गेलं, तर देशात चुकीची प्रथा पडू शकेल. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून महिन्या-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं. त्यामुळे या प्रकरणाची नक्कीच चौकशी झाली पाहिजे. 


पोलिस बऱ्याचदा घडलेल्या घटनांवर पडदा पाडण्यासाठी असे एन्काऊंटर करतात. मारले गेलेले सर्व आरोपी हे खरंच गुन्हेगार होते की नाही, याबद्दल शंका आहे. ते खरेच आरोपी असते, तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती. परंतु त्यांना अशाप्रकारे मारणं हे चुकीचं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी ताब्यात असलेले ४ नराधम पोलिस एन्काउंटरमध्ये मारले गेले. पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, पीडितेवर ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, तिथंच ही कारवाई करण्यात आली. याबाबत देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

संबंधित विषय