एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची पोलीस दलात पुन्हा एण्ट्री !


एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची पोलीस दलात पुन्हा एण्ट्री !
SHARES

अंडरवर्ल्डमधील गँगस्टर्सचा एकेकाळचा कर्दनकाळ तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पुन्हा एकदा पोलीस दलात एण्ट्री झाली आहे. मात्र शर्मा यांना नेमके कुठे नियुक्त करायचे, यासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. लखनभैया खोट्या एन्काऊंटरमध्ये त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी शर्मा यांची निर्दोष सुटका झाली होती. तसेच 'मॅट'ने देखील त्यांच्याच बाजूने निकाल दिला होता.

1990 च्या दशकात जेव्हा मुंबईवर अंडरवर्ल्डची पकड होती. दिवसाढवळ्या केव्हाही गँगवॉरमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडायचा, तेव्हा या टोळ्यांना संपविण्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काऊंटरचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले होते. यानुसारदिसेल त्या गँगस्टराला यमसदनी पाठविण्याचा धडाका मुंबई पोलिसांनी लावला होता.

प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, दया नायक, दशरथ आव्हाड, अंबादास पोटे, सचिन वझे या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्यांनी गँगस्टरांच्या अड्ड्यावर घुसून त्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली. मात्र यादरम्यान पोलिसांना हाताशी धरून काही गुंडानी खोट्या एन्काऊंटरद्वारे आपल्या वैऱ्याला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांवर आरोप झाला.

याच दरम्यान 113 गुंडांचे एन्काऊंटर करणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यावरही रामनारायण ऊर्फ लखनभैय्या गुप्ताचे 11 नोव्हेंबर 2006 रोजी खाेटे एन्काऊंटर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणांत शर्मा यांच्यासह 13 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही अटक झाली होती. मात्र पुराव्याअभावी शर्मा यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली.

शर्मा यांनी आरपीआयकडून निवडणूक लढविण्याचा अर्ज देखील भरला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती. आता त्यांच्या पुनर्वसनाला दुजोरा मिळाल्यानंतर त्यांची नियुक्ती कुठे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा