प्रतीक्षानगरमध्ये खंडणीसाठी सोनाराला मारहाण

 Mumbai
प्रतीक्षानगरमध्ये खंडणीसाठी सोनाराला मारहाण

प्रतीक्षानगर - जय महाराष्ट्र नगरमध्ये राहणाऱ्या बबलू सुवर्ण सरदार नावाच्या सोनाराचा मोबाईल हिसकावून एक लाख रुपयाच्या खंडणीसाठी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री 11. 30 वाजता घडली. या प्रकरणी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी गंभीर दखल घेतली असून, पोलीस निरीक्षक सुनील कदम आणि पोलीस उपनिरीक्षक नरेश सावंत यांनी स्थानिक गुंडांना तातडीने पकडण्याचे आदेश दिले आहेत. तपासा दरम्यान दोन आरोपींची ओळख पोलिसांना पटली असून त्यामध्ये पोलीस अभिलेखावर असलेला स्थानिक गुंड त्यागराज उर्फ (त्यागी), अरविंद व तिसरा अज्ञात इसम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रविवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व कामे आटोपून झोपण्याच्या तयारीत असलेल्या बबलू सरदारच्या घरात त्यागी नावाच्या गुंडाने आपल्या दोन साथीदारांसह जबरदस्तीने प्रवेश केला आणि ते एक लाख रुपयाची मागणी करू लागले. रात्रीच्या अंधारात स्थानिक गुंडाची मागणी ऐकून भेदरलेल्या बबलू सरदारने त्यांची मागणी धुडकावली असता संतापलेल्या गुंडांनी त्याला मारहाण केली. त्याच्या जवळील महागडा मोबाईल हिसकावून घेतला असून, त्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी पोबारा केला. दरम्यान जीवे मारण्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या बबलू सरदारने तत्काळ वडाळा टी टी पोलीस ठाण्यात स्थानिक गुंडाविरुद्ध तक्रार दाखल केली असून, वडाळा टी टी पोलीस या त्रिकुटाचा शोध घेत आहेत.

Loading Comments