घानाच्या आगंतुकाला व्हिआयपी ट्रीटमेंट देता देता जुहू पोलीस हैराण


घानाच्या आगंतुकाला व्हिआयपी ट्रीटमेंट देता देता जुहू पोलीस हैराण
SHARES

गुन्हेगारांना नेहमीच अद्दल घडवणाऱ्या मुंबई पोलिसांचा हात कुणी धरू शकत नाही. गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी मुंबई पोलिसांची ओळख. मात्र, सध्या मुंबई पोलिसांना घानाच्या एका नागरिकाने चांगलेच जेरीस आणले आहे. याच कारण आहे त्याचं हायफाय राहणं आणि हायफाय खाणं. 

जानेवारीपासून जुहू पोलीस ठाण्यात वास्तव्यास असलेला एडवर्ड खोफिबेन(32) नावाचा इसम सध्या मुंबई पोलिसांची डोकेदुखी ठरत चालला आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्याच्या जीभेचे चोचले पुरवून पुरवून जुहू पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. विशेष म्हणजे त्याला पोलीस ना मायदेशी पाठवू शकत ना त्याला मोकळं सोडू शकत. तो 10 जानेवारीपासून जुहू पोलीस ठाण्यात आहे. मायदेशाने त्याला स्वीकारण्यास नकार दिला आहे तर अनधिकृतरीत्या देशात असल्याने पोलीस त्याला मोकळं सोडू शकत नाहीत. सकाळ-दुपार संध्याकाळ त्याच्यावर पोलिसांना लक्ष ठेवावं लागत आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे महायश परदेशी असल्यानं तो आपलं जेवणंही जेवत नाही. कधी या महाशयांना चिकन बिर्याणी तर कधी चिकन नूडल्स लागतात. पिझ्झा तर त्याच्या खास आवडीचा. त्याला कपडे देखील ब्रॅडेंड लागतात आणि हे सर्व पोलिसांनाच पुरवावं लागतं.एकीकडे एडवर्डवर 24 तास पाळत ठेवण्यासाठी 2 पोलीस कर्मचारी रात्रदिवस अड़कून पडतात तर दुसरीकडे याचे चोचले पोलिसांना आपल्या खिशातून पुरवावे लागत आहेत. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे नेमकं आणखी किती महिने या एडवर्डला पोसावे लागेल याचा नेम नाही, असं पोलीस खासगीत बोलत आहेत.

बनावट पासपोर्टवर देशात वास्तव्य केल्याबद्दल एडवर्डला 2013 साली अटक करण्यात आली, त्यानंतर त्याला चार वर्षांची शिक्षा झाली. जानेवारी 2017 ला शिक्षा भोगल्यानंतर या एडवर्डला डिपोर्टेशनसाठी जुहू पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र ज्यावेळी जुहू पोलिसांनी घाना एम्बेसीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी एडवर्डला स्वीकारण्यास नकार दिला. त्याने दावा केला होता की, तो घानाच्या अकारा ठिकाणचा राहणारा आहे. पण त्याचा पत्ता सापडत नसल्याचं सांगत घानाने एडवर्डला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आता या एडवर्डचं काय करायचं आणि आणखीन किती दिवस याला असंच पोसायचं, हा प्रश्न संपूर्ण जुहू पोलीस ठाण्याला पडलाय.
"मी घानाचा रहिवाशी असून, मला माझ्या देशात परत जायचं आहे पण ही लोकं माला सोडत नाहीत जर सोडलं तर मी स्वतः एम्बेसीशी संपर्क करेन", अशी प्रतिक्रिया एडवर्डने 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा