गिरणी कामगारांच्या घरांची दलाली करणारा गजाआड


गिरणी कामगारांच्या घरांची दलाली करणारा गजाआड
SHARES

मुंबई – लॉटरीत घर लागलेल्या गिरणी कामगारांची माहिती मिळवून त्यांची घरं लाटणारा एक दलाल अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दत्ता खाडे (38) असं त्याचं नाव आहे. काळाचौकी पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली. खाडेनं 10 जणांची फसवणूक केल्याचं तपासात उघड झालंय. म्हाडातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार खाडे बऱ्याच वर्षांपासून दलाली करत असून त्यानं अनेकांना फसवल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेमुळे गिरणी कामगारांच्या घराच्या दलालीतले अनेक धागेदोरे समोर येण्याचीही शक्यता आहे.
तीन-चार महिन्यांपूर्वीच खाडेविरोधात तक्रार आली होती. पण तो सापडत नव्हता. तो घाटकोपरमधल्या घरी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक दिलीप उगले यांनी दिली. त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले.

खाडे मूळचा म्हसवड-साताऱ्याचा असून सध्या तो रमाबाई आंबेडकरनगर, प्रियदर्शनी येथे राहतो. कामगारांना आमीष दाखवून घर लाटायचं आणि जास्त किमतीला विकायचं, असा त्याचा धंदा होता. त्यानुसार सतीश चव्हाण आणि मंजुळा गायकवाड यांना खाडेनं घर विकलं होतं. पण अनेक महिने उलटूनही घर मिळत नसल्यानं या दोघांनी खाडेकडे तगादा लावला. त्यामुळे खाडे फरार झाला आणि या दोघांनी काळाचौकी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गुरुवारी पोलिसांनी सापळा लावून खाडेला अटक केली.

म्हाडाच्या भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय कुठल्याही दलालाला घरं लाटणं शक्यच होणार नाही. मुंबई लाइव्हनं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे नुकतेच हे वास्तव उघड केलं होतं. त्यामुळे खाडेचंही म्हाडातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साटंलोटं असू शकतं, अशी शक्यता गिरणी कामगारांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. या शक्यतेची तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर मुंबई लाइव्हनं केलेल्या स्टिंगमधील दलालांनाही पोलिसांनी शोधून काढत त्यांना अटक करण्याची मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा